For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय युवा महिला संघाचे सलग दुसरे जेतेपद

06:58 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय युवा महिला संघाचे सलग दुसरे जेतेपद
Advertisement

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 गड्यांनी पराभव : त्रिशा गोंगाडीला दुहेरी मुकुट

Advertisement

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

रविवारी येथे झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद भारतीय युवा महिला संघाने सलग दुसऱ्यांदा जिंकताना अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या त्रिशा गोंगाडीला ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’ असा दुहेरी मुकुट मिळाला. या स्पर्धेत भारतीय युवा महिला संघाने एकही सामना न गमाविता चषकावर आपले दुसऱ्यांदा नाव कोरुन परिपूर्ण दर्जेदार असल्याचे दाखवून दिले.

Advertisement

या स्पर्धेत भारतीय युवा महिला संघाने पहिल्या सामन्यापासून ते शेवटपर्यंत सांघिक आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजेतेपद हस्तगत केले. रविवारच्या अंतिम सामन्यातही भारताने 52 चेंडू बाकी ठेऊन दक्षिण आफ्रिकेला नमविले. या सामन्यात त्रिशा गोंगाडीने गोलंदाजी करताना 15 धावांत 3 तर फलंदाजीत 33 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 44 धावा झळकाविल्या.

रिनेकीच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या फिरकी माऱ्यासमोर त्यांचा डाव 82 धावांत आटोपला. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज डावखुरी आयुषी शुक्लाने आपल्या 4 षटकात 9 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. तर त्रिशा गोंगाडीने 3 व वैष्णवी शर्मा आणि सिसोदिया यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शबनम शकिलने 1 बळी मिळविला. भारताच्या डावामध्ये त्रिशाने पुन्हा महत्त्वाची खेळी करताना नाबाद 44 धावा झळकाविल्या. उपकर्णधार सानिया चाळकेने 22 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या. चाळके आणि त्रिशा यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 48 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी सलामीची जोडी कमलिनी आणि त्रिशा यांनी 27 चेंडूत 36 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावातील 5 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या रिनेकीने कमलिनीला झेलबाद केले. तिने 13 चेंडूत 1 चौकारासह 8 धावा जमविल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघातील डावखुरी फिरकी गोलंदाज पारुनिका सिसोदियाने दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेची सलामीची फलंदाज लॉरेन्सला खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचीत केले. त्यानंतर शबनम शकिलने सलामीच्या जेमा बोथाला कमलिनीकरवी झेलबाद केले. बोथाने 14 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. चौथ्या षटकाअखेर दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 20 धावा जमविल्या होत्या. दरम्यान, आयुषी शुक्लाने डायरा रॅमलकनचा त्रिफळा उडविला. 10 षटकाअखेर दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 33 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र यानंतर दक्षिण आफ्रिकेला ही बऱ्यापैकी स्थिती कायम राखत आली नाही. कर्णधार रिनेकी (7) त्रिशा गोंगाडीच्या गोलंदाजीवर सिसोदियाकरवी झेलबाद झाली. दक्षिण आफ्रिकेच्या व्हॅन वुर्स्टने 18 चेंडूत 3 चौकारांसह 23 तर कॉलिंगने 20 चेंडूत 1 षटकारासह 15 धावा जमविल्या. आयुषी शुक्लाने मेसोचा 10 धावांवर त्रिफळा उडविला तर त्रिशाने वुर्स्टचा बळी मिळविला. त्यानंतर त्रिशाने एस. नायडुला खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचीत केले. वैष्णवी शर्माने कॉलिंगला बाद करुन आपल्या संघासमोरील महत्त्वाचा अडथळा दूर केला. वुर्स्ट आणि कॉलिंग यांनी सहाव्या गड्यासाठी 30 धावांची भागिदारी केली. सिसोदियाने व्हॅन वीकला बाद करुन दक्षिण आफ्रिकेला 82 धावांवर रोखले.

भारताच्या डावामध्ये पॉवरप्लेच्या 6 षटकात 44 धावा जमविताना 1 गडी बाद झाला. भारताचे अर्धशतक 44 चेंडूत नोंदविले गेले. 10 षटकाअखेर भारताने 1 बाद 71 धावा जमविल्या होत्या. भारताच्या डावामध्ये 13 चौकार नोंदविले गेले.

त्रिशाचे मालिकेत वर्चस्व

या स्पर्धेत त्रिशा गोंगाडीने स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात शतक (110) झळकवले होते.या स्पर्धेत तिने 7 सामन्यात 77.25 धावांच्या सरासरीने सर्वाधिक म्हणजे 309 धावा जमविल्या तर गोलंदाजीत तिने 6.42 धावांच्या सरासरीने 7 गडी बाद केले. भारतातर्फे वैष्णवी शर्माने या स्पर्धेत 6 सामन्यातून 4.35 धावांच्या सरासरीने सर्वाधिक म्हणजे 17 गडी बाद केले. आयुषी शुक्लाने 7 सामन्यातून 14 बळी मिळविले.

विद्यमान विजेत्या भारतीय युवा महिला संघाने प्राथमिक फेरीतील विंडीज, मलेशिया आणि श्रीलंका विरुद्धचे सामने एकतर्फी जिंकून सुपर 6 फेरीत प्रवेश मिळविला. त्यानंतर भारताने सुपर 6 फेरीत बांगलादेश आणि स्कॉटलंड यांचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य लढतीत भारताने इंग्लंडचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणत आपणच पुन्हा या स्पर्धेचे प्रमुख दावेदार असल्याचे दाखवून दिले. रविवारच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेलाही असेच पराभूत करुन हा विश्वास सार्थ ठरविला.

संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका 20 षटकात सर्वबाद 82 (बोथा 16, मेसो 10, रिनेकी 7, व्हॅन वुर्स्ट 23, कॉलिंग 15, अवांतर 6, त्रिशा गोंगाडी 3-15, वैष्णवी शर्मा 2-23, आयुषी शुक्ला 2-9, पी. सिसोदिया 2-6, शबनम शकिल 1-7), भारत 11.2 षटकात 1 बाद 84 (जी. कमलिनी 8, त्रिशा गोंगाडी नाबाद 44, सानिका चाळके नाबाद 26, अवांतर 6, रिनेकी 1-14).

Advertisement
Tags :

.