भारतीय युवा महिला संघ अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / सिंगापूर
येथे सुरू असलेल्या 19 वर्षांवरील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय युवा महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना लंकेचा 4 गड्यांनी पराभव केला. भारतीय संघातील गोलंदाज आयुषी शुक्लाने 10 धावांत 4 गडी बाद करत ‘सामनावीरा’चा बहुमान मिळविला.
या स्पर्धेतील शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकाने 20 षटकात 9 बाद 98 धावा जमवित 99 धावांचे माफक आव्हान दिले. त्यानंतर भारताने 14.5 षटकात 6 बाद 102 धावा जमवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
बांगलादेशच्या डावामध्ये 2 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. कर्णधार मेनुदी नेनायकराने 30 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 33 तर एस. निशानसेलाने 31 चेंडूत 1 चौकारांसह 21 धावा केल्या. सेवांडीने 7 चेंडूत 1 चौकारांसह 8 धावा जमविल्या. लंकेला 11 अवांतर धावा मिळाल्या. लंकेच्या डावात 5 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे आयुषी शुक्ला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 10 धावांत 4 गडी बाद केले. पी. सिसोदीयाने 27 धावांत 2, केसरीने 27 धावांत 1 तर शबनम शकीलने 8 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये जी. त्रिशाने 24 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 32, जी. कमलिनीने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28, मिथीला विनोदने 12 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 17, सानिका चाळकेने 1 चौकारांसह 4, कर्णधार निकी प्रसादने 3 धावा, भाविका अहीरेने 1 चौकारांसह 7 धावा जमविल्या. भारताच्या डावात 4 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. भारताला 10 अवांतर धावा मिळाल्या. लंकेतर्फे प्रभोधाने 16 धावांत 3 तर एस. गिमहानीने 18 धावांत 2 गडी बाद केले. भारताने हा सामना 31 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी जिंकला. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी बांगलादेश आणि लंकेवर मात केली. तर भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना निकाली होऊ शकला नाही.
संक्षिप्त धावफलक: लंका 20 षटकात 9 बाद 98 (नेनायकर 33, निशानसेला 21, अवांतर 11, आयुषी शुक्ला 4-10, सिसोदीया 2-27, केसरी आणि शबनम शकील प्रत्येकी 1 बळी), भारत 14.5 षटकात 6 बाद 102 (त्रिशा 32, कमलिनी 28, मिथिला विनोद नाबाद 17, अवांतर 10, प्रबोधा 3-16, गिमहानी 2-18)