भारतीय युवा संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी तसेच कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियन युवा संघाचा 117 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन युवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया युवा संघाने 50 षटकात 9 बाद 225 धावा जमवित भारतीय युवा संघाला विजयासाठी 226 धावांचे आव्हान दिले. भारतीय युवा संघाने केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलिया युवा संघाचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला.
ऑस्ट्रेलियन युवा संघातील जॉन जेम्सने 66 चेंडूत 77 धावांची खेळी केली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया युवा संघाची स्थिती 4 बाद 35 अशी केविलवाणी झाली होती. ऑस्ट्रेलियन युवा संघातील टॉम होगेनने धावांसाठी संघर्ष करीत 81 चेंडूत 41 धावा जमविल्या. तर स्टिव्हन होगेनने 39 धावांची खेळी केली. भारतीय युवा संघातर्फे हेनिल पटेलने 38 धावांत 3 तर कनिष्क चौहानने 39 धावांत 2 आणि किशन कुमारने 59 धावांत 2 गडी बाद केले. अंबरिशने 50 धावांत 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय युवा संघाच्या डावाला आक्रमक सुरुवात झाली. सलामीचा स्फोटक फलंदाज 14 वर्षीय सूर्यवंशीने केवळ 22 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 38 धावा तडकावल्या. सूर्यवंशी आणि कर्णधार म्हात्रे यांनी सलामीच्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली. त्यामध्ये म्हात्रेचा वाटा केवळ 6 धावांचा होता. स्किलेरने सूर्यवंशीला तर लॅचमंडने म्हात्रेला बाद केले. भारताचे हे दोन गडी लवकर बाद झाले. विहान मल्होत्रा केवळ 9 धावांवर तंबूत परतला. लॅचमंडने त्याचा बळी मिळविला. 10 व्या षटकाअखेर भारतीय युवा संघाची स्थिती 3 बाद 75 अशी होती.
वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू या जोडीने संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी अभेद्य 152 धावांची भागिदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताने 30.3 षटकात 3 बाद 226 धावा जमवित हा सामना 7 गड्यांनी जिंकला. कुंडूने 74 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 87 तर त्रिवेदीने 69 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 61 धावा झळकाविल्या. ऑस्ट्रेलियन युवा संघातर्फे लॅचमंडने 46 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया युवा संघ 50 षटकात 9 बाद 225 (जॉन जेम्स नाबाद 77, टॉम होगेन 41, स्टिव्हन होगेन 39, हेनिल पटेल 3-38, कनिष्क चौहान व किशन कुमार प्रत्येकी 2 बळी, अंबरीश 1-50), भारतीय युवा संघ 30.3 षटकात 3 बाद 226 (वैभव सूर्यवंशी 22 चेंडूत 38, अभिज्ञान कुंडू 74 चेंडूत नाबाद 87, वेदांत त्रिवेदी 69 चेंडूत नाबाद 61, मल्होत्रा 9, लॅचमंड 2-46).