भारतीय युवा संघ भक्कम स्थितीत
हरवंश सिंग पांगलीयाचे दमदार शतक, ऑस्ट्रेलिया प. डाव 3 बाद 142, पीकेचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ चेन्नई
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया युवा 19 वर्षाखालील वगोगटाच्या युवा संघामध्ये येथे सुरू असलेल्या चार दिवसांच्या कसोटी सामन्यात मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी हरवंशसिंग पांगलीयाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय युवा संघाने पहिल्या डावात 492 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया युवा संघाने पहिल्या डावात 3 बाद 142 धावा केल्या.
सौराष्ट्रचा यष्टिरक्षक आणि फलंदाज पांगलीयाने 11 व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अनमोलजित सिंग् समवेत शेवटच्या गड्यासाठी 90 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. पांगलीयाने 143 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांसह 117 धावा झळकविल्या. तर अनमोलजित सिंग 1 चौकारासह 11 धावावर नाबाद राहिला. भारतीय युवा संघाने 5 बाद 316 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांच्या शेवटच्या पाच गड्यांनी 176 धावांची भर घातली. कर्णधार सोहम पटवर्धनने 124 चेंडूत 6 चौकारांसह 63, निखिल कुमारने 7 चौकारांसह 61, नित्या पंड्याने 12 चौकारांसह 94 आणि कार्तिकेयने 99 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 71 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया संघातर्फे पॅटर्सन, होकेस्ट्रा, होवे, रेनाल्डो यांनी प्रत्येकी 2 तर रामकुमार आणि किंगसेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले तीन फलंदाज केवळ 42 धावांत बाद झाले. मोहम्मद इनानने सलामीच्या किंगसेलला 4 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर अनमोलजित सिंगने सिमॉन बजचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. मोहम्मद इनानने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना होगेनला 11 धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर कर्णधार पीके आणि यंग यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने दिवसअखेर चौथ्या गड्यासाठी अभेद्य 100 धावांची भागिदारी केली. कर्णधार पीके 1 षटकार आणि 8 चौकारांसह 62 तर यंग 6 चौकारांसह 45 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलिया युवा संघ अद्याप 350 धावांफी पिछाडीवर असून त्यांचे सात गडी खेळावयाचे आहेत. भारतातर्फे मोहम्मद इनानने 27 धावांत 2 तर अनमोलजित सिंगने 40 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: भारत युवा संघ प. डाव 133.3 षटकात सर्वबाद 492 (पांगलीया 117, पंड्या 94, कार्तिकेय 71, पटवर्धन 63, निखिल कुमार 61, होकेस्ट्रा, होवे, पॅटर्सन, रेनाल्डो प्रत्येकी 2 बळी.), ऑस्ट्रेलिया युवा संघ प. डाव 44 षटकात 3 बाद 142 (पीके खेळत आहे 62, यंग खेळत आहे 45, मोहम्मद इनान 2-27, अनमोलजित सिंग 1-40)