For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय युवा संघाची ऑस्ट्रेलियावर नाममात्र आघाडी

06:44 AM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय युवा संघाची ऑस्ट्रेलियावर नाममात्र आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था / मॅके (ऑस्ट्रेलिया)

Advertisement

भारत आणि ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील वयोगटातील येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळाचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविताना 17 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया युवा संघाचा पहिला डाव 135 धावांत आटोपल्यानंतर भारत युवा संघाने पहिल्या डावात दिवसअखेर 7 बाद 144 धावा जमवित नाममात्र 9 धावांची आघाडी मिळविली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हेनील पटेल आणि खिलन पटेल यांच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया युवा संघाला पहिल्या डावात केवळ 135 धावांपर्यंत मजल मारता आली. अॅलेक्स यंगने एकाकी लढत देत 108 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 66 धावा जमविल्या. तर यश देशमुखने 54 चेंडूत 2 चौकारांसह 22 तर कर्णधार मॅलेझुकने 15 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया युवा संघाच्या पहिल्या डावात केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया युवा संघाचा निम्मा संघ केवळ 32 धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर यश देशमुख आणि यंग यांनी सहाव्या गड्यासाठी 59 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलिया युवा संघाने उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात 10 षटकाअखेर आपले पाच गडी 32 धावांत गमविले होते. देशमुख बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे शेवटचे पाच फलंदाज केवळ 44 धावांची भर घालत तंबूत परतले. 43.3 षटकात ऑस्ट्रेलिया युवा संघाचा पहिला डाव 135 धावांवर आटोपला. हेनिल पटेल आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी 3 तर उद्धव मोहनने 23 धावांत 2 आणि देवेंद्रनने 1 गडी बाद केला.

Advertisement

गोलंदाजीस अनकुल असलेल्या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाजांप्रमाणेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीही पुरेपूर फायदा उचलला. भारत युवा संघाच्या डावामध्ये सलामीचा विहान मल्होत्रा चौथ्या षटकात तंबूत परतला. त्याने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे 4 धावांवर झेलबाद झाला. आक्रमक फटकेबाजी करणारा वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. वेदांत त्रिवेदीने 44 चेंडूत 4 चौकारांसह 25 धावा केल्या. राहुलकुमार 9 धावांवर बाद झाला तर पांगलिया 1 धावेवर बाद झाला. भारताचा निम्मा संघ 16 षटकात 81 धावांत बाद झाला होता. गोलंदाजीत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या खिलान पटेल आणि हेनिल पटेल यांनी संघाला बऱ्यापैकी सावरताना सातव्या गड्यासाठी 48 धावांची भागिदारी केल्याने भारताला 144 धावांपर्यंत मजल मारता आली. खिलान पटेलने 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. हेनिल पटेल 3 चौकारांसह 22 तर देवेंद्रन 1 चौकारासह 6 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलिया युवा संघातर्फे बार्टनने 39 धावांत 3, बिरॉमने 31 धावांत 2 तर लेचमंड आणि ओसबोर्नी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया युवा संघ प. डाव 43.3 षटकात सर्वबाद 135 (यंग 66, देशमुख 22, अवांतर 12, हेनिल पटेल व खिलन पटेल प्रत्येकी 3 बळी, उद्धव मोहन 2-23, देवेंद्रन 1-22), भारत युवा संघ प. डाव 40 षटकात 7 बाद 144 (खिलान पटेल 26, वेदांत त्रिवेदी 25, सूर्यवंशी 20, मल्होत्रा 11, हेनिल पटेल खेळत आहे 22, अवांतर 20, बार्टन 3-39, बिरॉम 2-33, लेचमंड व ओसबोर्नी प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.