भारतीय युवा फुटबॉल संघ अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ थिंपू (भुतान)
येथे सुरू असलेल्या 2024 च्या 17 वर्षांखलील वयोगटाच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने शनिवारच्या सामन्यात नेपाळचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
भारत आणि नेपाळ यांच्यातील हा सामना पूर्वार्धात चुरशीचा झाला. पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांकडून गोल नोंदविला गेला नाही. या सामन्यातील 6 गोल खेळाच्या उत्तरार्धात नोंदविले गेले. भारतातर्फे विशाल यादवने 61 व्या आणि 68 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. ऋषी सिंगने 85 व्या मिनिटाला तर एच. लुनकीमने 100 व्या मिनिटाला गोल केले. 81 व्या मिनिटाला सुभाष बामने नेपाळचा पहिला गोल केला तर 89 व्या मिनिटाला भारतीय संघातील मोहम्मद कैफने नजरचुकीने आपल्याच संघाच्या गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून नेपाळला बोनस गोल दिला. आता या स्पर्धेतील अंतिम सामना सोमवारी खेळविला जाणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याबरोबर भारताचा अंतिम सामना होईल.