कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ
दुसऱ्या दिवशीचा खेळही रद्द
वृत्तसंस्था/ कानपूर
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसाने खोळंबा घातला. यामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. आता, तिसऱ्या दिवशी खेळ सुरु होतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशीही पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी केवळ 35 षटके खेळता आली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. मोमिनुल हक 40 आणि मुशफिकर रहीम 6 धावा करून नाबाद माघारी परतले. आता दुसरा दिवस देखील पावसामुळे वाहून गेला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, यामुळे तिसऱ्या दिवशी खेळ होतो की नाही, याकडे चाहत्याचं लक्ष असेल. दरम्यान, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.