इस्तंबुल स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कुस्ती फेडरेशनने पुढील महिन्यात इस्तंबुलमध्ये होणाऱ्या शेवटच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी बिश्केक येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेतील संघचा कायम ठेवला आहे. नवीन चाचणी घेण्यासाठी वेळ उपलब्ध नसल्याने फेडरेशनने हा निर्णय घेतला आहे.
9 ते 13 मे या कालावधीत इस्तंबुलमध्ये होणाऱ्या वर्ल्ड ऑलिम्पिक क्रीडा पात्रता स्पर्धेसाठी तीन खेळाडूंचा अपवाद वगळता बिश्केकमध्ये खेळलेला संघच कायम ठेवण्यात आला आहे. विनेश फोगट (50 किलो), अन्शू मलिक (57 किलो), यू-23 वर्ल्ड चॅम्पियन रीतिका (76 किलो) यांनी बिश्केकमध्येच ऑलिम्पिक कोटा मिळविला असल्याने त्यांना वगळण्यात आले आहे.
बिश्केकमधील स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचे खराब प्रदर्शन झाल्याने डब्ल्यूएफआय बरेच नाराज असल्याचे समजते. त्यामुळे शेवटच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पुन्हा एकदा निवडचाचणी घेण्याची योजना फेडरेशनने आखली आहे. मात्र इस्तंबुल स्पर्धेआठी पुरेसा वेळ नसल्याने पुन्हा चाचणी घेण्याची योजना रद्द करण्यात आल्याचे फेडरेशनमधील सूत्राने सांगितले.
इस्तंबुलमध्ये सहा वजन गटासाठी एकूण 54 ऑलिम्पिक कोटा मिळणार असल्याने भारताच्या आणखी काही मल्लांना कोटा मिळविण्याची संधी आहे. प्रत्येक वजन गटासाठी तीन ऑलिम्पिक कोटा असून अंतिम फेरी गाठणारे दोन व कांस्यपदकाच्या प्लेऑफ लढतीतील विजेयी मल्ल यांना पात्रता मिळणार असल्याचे सोमवारी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (यूडब्ल्यूब्ल्यू) सांगितले. 9 मे रोजी ग्रीको रोमन प्रकार सुरू होईल, त्यानंतर महिलांच्या कुस्त्या झाल्यानंतर फ्रीस्टाईल प्रकार होईल. 13 मे रोजी स्पर्धेची सांगता होईल, असे यूडब्ल्यूब्ल्यूने सांगितले.
इस्तंबुल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय कुस्ती संघ : फ्रीस्टाईल : अमन (57 किलो), सुजीत (65 किलो), जयदीप (74 किलो), दीपक पुनिया (86), दीपक (97), सुमित (125). ग्रीको रोमन : सुमित (60), आशू (67), विकास (77), सुनील कुमार (87), नितेश (97), नवीन (130). महिला : मानसी (62), निशा (68).