भारतीय महिला विश्वविजेत्या!
द.आफ्रिकेला नमवत टीम इंडियाने जिंकला पहिला वाहिला वर्ल्डकप : शेफाली वर्मा सामनावीर तर दीप्ती शर्मा मालिकावीर
वृत्तसंस्था/ मुंबई
रविवारी नवी मुंबईत झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. या विजयासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली प्रथम महिला वर्ल्ड कप अखेर भारताने जिंकला. डी वाय पाटील स्टेडियमवर 35000 हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने हरमनप्रीतने जेतेपदाचा करंडक उंचावला आणि देशभरात चाहत्यांचा एकच जल्लोष पहायला मिळाला. शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
प्रारंभी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावत 298 धावा केल्या. यानंतर मोठ्या लक्ष्याचा सामना करताना दक्षिण आफ्रिका 246 धावा करून सर्वबाद झाला. कर्णधार लॉरा वोल्वार्डने शतक झळकावले, पण संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. विशेष म्हणजे, 2017 मध्ये भारतीय संघाला वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्या पराभवाचा सल मोडून काढत भारतीय संघाने न भूतो न भविष्यती अशी देदिप्यमान कामगिरी केली. विशेष म्हणजे, महिला वनडे वर्ल्डकप जिंकणारा भारत चौथा संघ ठरला आहे. याआधी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडने वर्ल्डकप जिंकला आहे.
कर्णधार वोल्वार्डची शतकी खेळी वाया
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या 299 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 246 धावांत ऑलआऊट झाला. सुरुवातीला आफ्रिकेला कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स या जोडीने शानदार सुरु करुन दिली. या दोघींत
पहिल्या विकेट्ससाठी 51 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर ताजमिन ब्रिट्स 23 धावा करून बाद झाली. त्यानंतर मैदानात आलेली अॅनेके बॉश भोपळा ही न फोडता माघारी गेली. सुन लुस आणि लॉरा वोल्वार्ड यांनी संघाला सावरले पण सून लुस ला शेफाली वर्माने बाद केले. त्यानंतर मारिझान कॅप 4, सिनालो जाफ्ता 16, अनेरी डेर्कसेन 35 धावा करून बाद झाली. या दरम्यान कर्णधार वोल्वार्डने एकाकी किल्ला लढवताना शतकी खेळी साकारली. तिने 98 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह 101 धावांचे योगदान दिले. ती बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून दिप्ती शर्माने 9.3 ओव्हरमध्ये 39 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर शेफाली वर्माने 2 विकेट्स घेतल्या आणि श्री चरणीने एक विकेट घेतली.

शेफालीची धमाकेदार खेळी
नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना पावसामुळे एक तास उशिरा सुरु झाला. प्रारंभी, आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात धमाकेदार केली. या दोघींनी शतकी भागीदारी करताना आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दरम्यान, 18 व्या षटकात स्मृतीला क्लो ट्रायॉनने 45 धावांवर बाद करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला. स्मृतीने 8 चौकारासह 45 धावा फटकावल्या. स्मृती बाद झाल्यानंतर शेफाली आणि जेमिमा यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. शतकाच्या उंबरठयावर असताना शेफालीला खाकाने तंबूचा रस्ता दाखवला. तिने 78 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारासह 87 धावांचे योगदान दिले. अंतिम सामन्यात जेमिमाला मोठी खेळी साकारता आली नाही. 24 धावा करुन ती माघारी परतली.

तिच्या विकेटनंतर मात्र दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी पुनरागमन करत भारताला सहजासहजी धावा करू दिल्य नाहीत. कर्णधार हरमनप्रीत कौरला 20 धावांवर नॉनकुलुलेको एमलाबाने त्रिफळाचीत केले, तर अमनजोत कौर 12 धावांवरच नादिन डी क्लर्कच्या गोलंदाजीवर तिलाच झेल देत बाद झाली. मात्र यानंतर दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांची जोडी जमली. या दोघींनी भारतीय संघाला तीनशेपर्यंत मजल मारुन दिली. यादरम्यान, दीप्तीने या स्पर्धेतील तिसरे अर्धशतकही केले. ऋचाही आक्रमक खेळत होती. पण 49 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाली. ऋचाने 24 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 34 धावांची खेळी केली. दीप्ती शर्मा शेवटच्या चेंडूवर धावबाद झाली. दीप्तीने 58 चेंडूत 58 धावा केल्या. अखेर भारताने 50 षटकात 7 बाद 298 धावा केल्या. राधा यादव 3 धावांवर नाबाद राहिली. गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून आयाबोंगा खाकाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत 7 बाद 298 (स्मृती मानधना 45, शेफाली वर्मा 87, जेमिमा रॉड्रिग्ज 24, हरमनप्रीत कौर 20, दीप्ती शर्मा 58, रिचा घोष 34, खाका 3 बळी)
दक्षिण आफ्रिका 45.3 षटकांत सर्वबाद 246 (लॉरा वोल्वार्ड 101, ब्रिट्स 23, सुने लुस 25, डेरक्सन 35, दीप्ती शर्मा 39 धावांत 5 बळी, शेफाली वर्मा 2 तर श्रीचरणी 1 बळी).
स्वप्ननगरीत स्वप्न साकार
2005 आणि 2017 मध्ये अधुरं राहिलेल स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्वप्ननगरीत साकार करून दाखवले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघाशिवाय वर्ल्ड कपची फायनल रंगल्याचे पाहायला मिळाले. भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलसह 25 वर्षानंतर नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार हे आधीच ठरलं होतं. अखेर तिसऱ्या प्रयत्नात भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप ट्रॉफीचं स्वप्न साकार केले. 
स्मृतीची आणखी एका विक्रमाला गवसणी
महिला वनडे वर्ल्ड कप मध्ये स्मृती मानधनाने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फलंदाजीच्या बळावर ती या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. एवढंच नव्हे, तर तिने मिताली राज हिचा विक्रम मोडीत काढला आहे. अंतिम सामन्यात आफ्रिकेविरुद्ध स्मृतीने 45 धावा केल्या. या खेळीमुळे ती एका वर्ल्ड कप हंगामात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. पूर्वी हा विक्रम मिताली राजच्या नावावर होता, जिने 2017 च्या वर्ल्ड कपमध्ये 409 धावा केल्या होत्या. मात्र स्मृतीने यंदाच्या स्पर्धेत 434 धावा करून हा विक्रम आपल्या नावावर केला. 
टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव
भारताने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्या संघाला फयानलमध्ये पराभूत केले आणि प्रथमच वर्ल्ड कपला गवसणी घातली. या पहिल्यावाहिल्या जेतेपदानंतर आता बीसीसीआय त्यांच्यावर पैशांचा वर्षाव करणार आहे. बीसीसीआयकडून भारतीय महिला संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय, वर्ल्डकप जिंकल्यानंतर आयसीसीकडून 39 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. उपजेत्या आफ्रिकन संघाला 20 कोटींचे बक्षीस मिळेल.
आम्ही जिंकलो याचा खूप आनंद आहे आणि मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. हा एक खूप संस्मरणीय क्षण आहे. जेव्हा मी सचिन तेंडुलकर यांना पाहिले तेव्हा मला एक अविश्वसनीय प्रोत्साहन मिळाले.
शेफाली वर्मा, भारतीय क्रिकेटपटू