तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघ विजेता
अंतिम लढतीत लंकन महिलांवर 97 धावांनी मात, स्मृती मानधना सामनावीर, स्नेह राणा मालिकावीर
वृत्तसंस्था/ कोलंबो
भारतीय महिला संघाने पूर्ण वर्चस्व राखत येथे झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत यजमान लंकेचा 97 धावांनी पराभव करून जेतेपद पटकावले. सामनावीर स्मृती मानधनाचे धडाकेबाज शतक आणि गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने हे यश मिळविले. मालिकेत 15 बळी टिपणाऱ्या स्नेह राणाला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
स्मृतीचे शतक आणि हरलीन देओल, कर्णधार हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्स यांच्या उपयुक्त योगदानामुळे भारताने प्रथम फलंदाजी निवडल्यावर 50 षटकांत 7 बाद 342 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर स्नेह राणा व अमनजोत कौर यांच्या भेदक माऱ्यापुढे लंकन महिलांचा डाव 49 व्या षटकांत 245 धावांत आटोपला. राणाने 38 धावांत 4 तर अमनजोत कौरने 54 धावांत 3 बळी मिळविले. लंकेतर्फे कर्णधार चमारी अटापटू (66 चेंडूत 51), निलाक्षिका सिल्वा (58 चेंडूत 48) यांनीच थोडेफार भरीव योगदान दिले.
दमट हवामान व क्रॅम्प्सशी मुकाबला करीत स्मृतीने शानदार शतक झळकवले. तिने 01 चेंडूत 116 धावा जमविल्या. त्यात 15 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. तिने वनडे प्रकारात सर्वाधिक 54 षटकार नोंदवण्याचा हरमनप्रीत कौरचा 53 षटकारांचा विक्रम मागे टाकला. तिने अटापटूच्या एका षटकात सलग चार चौकार ठोकत 11 वे वनडे शतक साजरे केले. सलामीवीर प्रतीका रावल 30 धावा काढून बाद झाली. 21 धावांवर असताना तिला जीवदान मिळाले. त्याचा लाभ घेत स्मृतीने दोन मोठ्या भागीदारी केल्या. प्रतीकासमवेत 70 धावांची सलामी दिली तर हरलीन देओलसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 106 चेंडूत 120 धावांची भागीदारी केली. हरलीनने 4 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आधीच्या सामन्यात शतक नोंदवलेल्या जेमिमा रॉड्रिग्सने झटपट धावा जमविताना 29 चेंडूत 44 धावा फटकावल्या. त्यात चार चौकारांचा समावेश होता. नंतर कर्णधार हरमनप्रीतनेही 30 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 41 धावा फटकावल्या. भारताने शेवटच्या 10 षटकांत 90 धावा फटकावल्या. शेवटच्या काही षटकांत दीप्ती शर्मा (14 चेंडूत नाबाद 20, अमनजोत कौर (12 चेंडूत 18) यांनी फटकेबाजी केल्यामुळे भारताला 340 ची मजल मारता आली. लंकेतर्फे सुगंदिका कुमारीने 59 धावांत 2, देवमी विहांगाने 69 धावांत 2 बळी मिळविले.
कठीण आव्हानाचा पाठलाग करताना लंकेने पहिल्याच षटकात हसिनी परेराला गमविले. अमनजोतने तिला त्रिफळाचीत केले. चमारी अटापटू व विशमी गुणरत्ने यांनी दुसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भर घातली. गुणरत्नेने 39 चेंडूत 41 धावा केल्या. दीप्ती गोलंदाजीस आल्यानंतर ही त्यांच्या धावगतीला ब्रेक लागला. तिने तीन षटकांत फार कमी धावा दिल्या. अमनजोतने गुणरत्नेला बाद केले. नंतर रिचा घोषने पदार्पणवीर क्रांती गौडच्या गोलंदाजीवर अटापटूचा झेल सोडला. त्यावेळी ती 25 धावांवर होती. नंतर क्रांतीनेही स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल सोडला. अटापटू अर्धशतक पूर्ण झाल्यावर राणाने तिला त्रिफळाचीत केले. आवश्यक धावगती वाढत गेल्याने लंकेला धावा जमविणे कठीण गेले आणि भारताचे जेतेपदही निश्चित झाले.
संक्षिप्त धावफलक : भारत महिला 50 षटकांत 7 बाद 342 : प्रतीका रावल 30, स्मृती मानधना 101 चेंडूत 116, हरलीन देओल 47, हरमनप्रीत 31, जेमिमा रॉड्रिग्स 44, रिचा घोष 8, अमनज्योत कौर 12 चेंडूत 18, दीप्ती शर्मा 14 चेंडूत नाबाद 20, क्रांती नाबाद 0, अवांतर 18. मल्की मदारा 2-74, विहांगा 2-69, सुगंदिका कुमारी 1-96.
लंकन महिला 48.2 षटकांत सर्व बाद 245 : गुणरत्ने 36, अटापटॅ 51, निलाक्षिका सिल्वा 48, हर्षिता समरविक्रमा 26, अनुष्का संजीवनी 28, सुगंदिका कुमारी 27, अवांतर 16. स्नेह राणा 4-38, अमनजोत कौर 3-54, श्री चरणी 1-55.