भारतीय महिला संघाकडून विंडीजचा व्हाईटवॉश
तिसऱ्या सामन्यात 5 गड्यांनी दणदणीत विजय, रेणुकासिंग ठाकुर ‘मालिकावीर’, अष्टपैलू दीप्ती शर्मा ‘सामनावीर‘
वृत्तसंस्था / बडोदा
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाने विंडीजचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान भारताने विंडीजचा 130 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात दिप्ती शर्माने अष्टपैलु कामगिरी करताना गोलंदाजीत 31 धावांत 6 बळी तर फलंदाजीत नाबाद 39 धावा झळकविल्या. या मालिकेत 10 बळी मिळविणाऱ्या रेणूकासिंग ठाकुरला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. दिप्ती शर्मा ‘सामनावीर’ ठरली.
या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव 38.5 षटकात 162 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने 28.2 षटकात 5 बाद 167 धावा जमवित सामना जिंकला.
विंडीजच्या डावात तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. सिनेली हेन्रीने 72 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 61, कॅम्पबेलने 62 चेंडूत 7 चौकारांसह 46 तर अॅलेनीने 35 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. विंडीजला 11 अवांतर धावा मिळाल्या. रेणूकासिंग ठाकुरने कर्णधार मॅथ्युज आणि जोसेफ या सलामीच्या जोडीला खातेही उघडू दिले नाही. कॅम्पबेल आणि हेन्री यांनी चौथ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या डावात 4 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे दिप्ती शर्माने 31 धावांत 6 तर रेणूकासिंग ठाकुरने 29 धावांत 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने आपले 3 आघाडीचे फलंदाज केवळ 55 धावांत गमविले. सलामीची मानधना सहाव्या षटकात झेलबाद झाली. तिने 4 धावा केल्या. त्यानंतर देवोलने केवळ 1 धाव जमवित तंबूचारस्ता धरला. रावलने 23 चेंडूत 4 चौकारांसह 18 धावा जमविल्या. कर्णधार कौर आणि रॉड्रिग्ज या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण फ्लेचरने कौरचा त्रिफळा उडविला. कौरने 22 चेंडूत 7 चौकारांसह 32 धावा जमविल्या. रॉड्रिग्जने 45 चेंडूत 1 चौकारांसह 29 धावा जमविताना दिप्ती शर्मा समवेत पाचव्या गड्यास 56 धावांची भागिदारी केली. दिप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनी विजयाचे सोपस्कार 28.2 षटकात पूर्ण केले. दिप्ती शर्माने 48 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 39 तर घोषने 11 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 23 धावा केल्या. भारताला 21 अवांतर धावा मिळाल्या. भारताच्या डावात 4 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे डॉटीन, अॅलेनी, मॅथ्युज, फ्लेचर, रॅमहॅरेक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीज महिला संघाला भारताच्या दौऱ्यामध्ये टी-20 आणि वनडे अशा दोन्ही मालिका गमवाव्या लागल्या.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 38.5 षटकात सर्वबाद 162 (हेन्री 61, कॅम्पबेल 46, अॅलेनी 21, अवांतर 11, दिप्ती शर्मा 6-31, रेणूकासिंग ठाकुर 4-29), भारत 28.2 षटकात 5 बाद 167 (दिप्ती शर्मा नाबाद 39, घोष नाबाद 23, रॉड्रिग्ज 29, कौर 32, रावल 18, मानधना 4, अवांतर 21, डॉटीन, अॅलेनी, मॅथ्युज, फ्लेचर, रामहरक प्रत्येकी 1)