भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव
ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी, इलेसी पेरी सामनावीर
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या दुसऱ्या वनडे सामन्यात जॉर्जिया व्हॉल आणि ‘सामनावीर’ इलेसी पेरी यांच्या शानदार शतकांच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा 122 धावांनी दणदणीत पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 बाद 371 धावा जमविल्या. त्यानंतर भारताचा डाव 44.5 षटकात 249 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलिया संघातर्फे नवोदित जॉर्जिया व्हॉलने 87 चेंडूत 12 चौकारांसह 101 तर इलेसी पेरीने 75 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांसह 105 धावा झोडपल्या. सलामीच्या लिचफिल्डने 36 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 60 तर बेथ मुनीने 44 चेंडूत 8 चौकारांसह 56 धावा जमविल्या. कर्णधार मॅकग्राने 12 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 7 षटकार आणि 40 चौकार नोंदविले गेले. भारताची गोलंदाजी पूर्णपणे निस्तेज ठरली. भारतातर्फे सईमा ठाकुरने 62 धावांत 3, मिनू मणीने 71 धावांत 2 तर रेणुकासिंग ठाकुर, दिप्ती शर्मा व प्रिया मिश्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लिचफिल्ड आणि व्हॉल यांनी सलामीच्या गड्यासाठी 130 धावांची भागिदारी केले. लिचफिल्ड बाद झाल्यानंतर व्हॉल आणि पेरी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 92 धावांची भर घातली. व्हॉलचे वनडे क्रिकेट पदार्पणातील हे पहिले शतक आहे.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावात सलामीच्या रिचा घोषने 72 चेंडूत 8 चौकारांसह 54, स्मृती मानधनाने 2 चौकारांसह 9, कर्णधार हरमनप्रित कौरने 42 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38, देओलने 2 चौकारांसह 12, रॉड्रिग्जने 5 चौकारांसह 43, दिप्ती शर्माने 1 चौकारासह 10 आणि मिनू मणीने 45 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 46 धावा जमविल्या. भारताच्या डावात 24 अवांतर धावा मिळाल्या. ऑस्ट्रेलियातर्फे अॅनाबेल सुदरलँडने 39 धावांत 4 तर मेगान शूट, गॅरेथ, गार्डनर, मॉलिन्यूक्स आणि किंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताच्या डावामध्ये 1 षटकार आणि 26 चौकार नेंदविले गेले. या मालिकेतील झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 गड्यांनी पराभव केला होता. रविवारच्या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेवर आपला शिक्कामोर्तब केला असून आता शेवटचा आणि तिसरा सामना येत्या बुधवारी वाका मैदानावर खेळविला जाईल.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 50 षटकात 8 बाद 371 (इलेसी पेरी 105, व्हॉल 101, लिचफिल्ड 60, मुनी 56, मॅकग्रा 20, सईमा ठाकूर 3-62, मिनू मणी 2-71, रेणुकासिंग ठाकूर, दिप्ती शर्मा आणि प्रिया मिश्रा प्रत्येकी 1 बळी), भारत 44.5 षटकात सर्व बाद 249 (रिचा घोष 54, देओल 12, कौर 38, रॉड्रिग्ज 43, मिनू मणी नाबाद 46, अवांतर 24, सुदरलँड 4-39, शूट, गॅरेथ, गार्डनर, मॉलिन्यूक्स, किंग प्रत्येकी 1 बळी).