भारतीय महिला संघाची मालिकेत विजयी सलामी
विंडीज महिलांनी सर्वात मोठा विजय, स्मृती मानधनाचे दमदार अर्धशतक : सामनावीर रेणुकासिंग ठाकुरचे पाच बळी
वृत्तसंस्था/ बडोदा
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाचे दमदार अर्धशतक आणि सामनावीर रेणुकासिंग ठाकुरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान भारताने विंडीजचा 211 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. भारताचा हा विंडीजवरील आजवरचा सर्वात मोठा विजय असून एकंदर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय आहे. याआधी 2017 मध्ये आयर्लंडवर भारताने 249 धावांनी सर्वात मोठा विजय मिळविला होता.
कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने या मालिकेत विजयाने दमदार सुरुवात केली आहे. अलिकडेच या मालिकेपूर्वी भारतीय संघाने विंडीजचा टी-20 मालिकेत पराभव केला होता. रविवारच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 50 षटकात 9 बाद 314 धावा जमवित विंडीजला निर्णायक विजयासाठी 315 धावांचे कठीण आव्हान दिले. पण भारताच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर हे आव्हान विंडीजला पेलवले नाही आणि त्यांना अखेर हा सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला.
भारताच्या डावाला स्मृती मानधना आणि पदार्पणवीर प्रतिका रावल यांनी दमदार सुरुवात करुन देताना 23.2 षटकात 110 धावांची शतकी भागिदारी केली. विंडीजच्या मॅथ्यूजने स्वत:च्याच गोलंदाजीवर रावलला टिपले. तिने 69 चेंडूत 4 चौकारांसह 40 धावा केल्या. रावल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या हरलीन देओलने मानधनासमवेत दुसऱ्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली. 32 व्या षटकात मानधना जेम्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. तिने 102 चेंडूत 13 चौकारांसह 91 धावा जमविल्या. तिचे शतक 9 धावांनी हुकले. डॉटीनने देओलचा त्रिफळा उडविला. तिने 50 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 44 धावा जमविल्या. देओल आणि कर्णधार कौर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भर घातली. कौरने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34 धावा जमविल्या. रिचा घोषने जोरदार फटकेबाजी करीत 13 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 26 तर रॉड्रीग्सने 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31 धावा झळकाविल्या. दीप्ती शर्माने 1 चौकारासह नाबाद 14 धावा केल्या. भारताचे शेवटचे 3 फलंदाज लवकर बाद झाले. भारताला 25 अवांतर धावा मिळाल्या. भारताच्या डावात 4 षटकार आणि 31 चौकार नेंदविले गेले. विंडीजतर्फे झईदा जेम्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 45 धावांत 5 तर मॅथ्यूजने 61 धावांत 2 आणि डॉटिनने 63 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रेणुकासिंग ठाकुरच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव 26.3 षटकात 103 धावांत आटोपल्याने भारताने हा सामना 211 धावांनी जिंकला. विंडीजच्या डावाला पहिल्या चेंडूपासूनच गळती लागली. सलामीची जोसेफ एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाली त्यावेळी संघाचे खातेही उघडले नव्हते. त्यानंतर कर्णधार हिली मॅथ्यूजला रेणुकासिंग ठाकुरने घोषकरवी झेलबाद केले. मॅथ्यूजला खाते उघडता आले नाही. त्यानंतर रेणुकासिंगने डॉटिनचा 8 धावांवर त्रिफळा उडविला. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या तितास साधूने विल्यम्सला 3 धावांवर त्रिफळाचीत केले. विंडीजची यावेळी स्थिती 4 बाद 11 अशी केविलवानी झाली होती. कॅम्पबेल आणि अॅलीन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना साध्य झाले नाही. रेणुकासिंगने अॅलीनला झेलबाद केले. तिने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. विंडीजचा निम्मा संघ 11 षटकात 26 धावांत तंबूत परतला होता. रेणुकासिंगने गजनबीला 3 धावांवर त्रिफळाचीत केले. प्रिया मिश्राने जेम्सला पायचीत केले. तिने 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. फ्लेचरने थोडाफार प्रतिकार करत 22 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 24 धावा जमविल्या. कॅम्पबेल 8 व्या गड्याच्या रुपात बाद झाली. रेणुकासिंगने तिला कौरकरवी झेलबाद केले. कॅम्पबेलने 39 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा केल्या. दीप्ती शर्माने रामहॅरेकला 11 धावांवर बाद केले. प्रिया मिश्राने कॉनेलला 8 धावांवर झेलबाद करुन विंडीजचा डाव 26.2 षटकात 103 धावांवर रोखला. विंडीजच्या डावामध्ये 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. विंडीजच्या डावात 13 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे रेणुकासिंग ठाकुरने 29 धावांत 5 गडी बाद केले. वनडे क्रिकेटमध्ये रेणुकासिंगने पहिल्यांदाच 5 गडी एका डावात बाद केले आहेत. प्रिया मिश्राने 22 धावांत 2 तर साधू आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा विंडीजवरील हा सर्वात मोठा विजय आहे.
संक्षिप्त धावफलक - भारत 50 षटकात 9 बाद 314 (स्मृती मानधना 91, प्र्रतिका रावल 40, हरलीन देओल 44, हरमनप्रित कौर 34, घोष 26, रॉड्रिग्ज 33, दिप्ती शर्मा 14, अवांतर 25, झईदा जेम्स 5-45, मॅथ्यूज 2-61, डॉटिन 1-63), विंडीज 26.2 षटकात सर्व बाद 103 (कॅम्पबेल 21, अॅलीन 13, फ्लेचर नाबाद 24, रामहॅरेक 11, अवांतर 3, रेणुकासिंग ठाकुर 5-29, प्रिया मिश्रा 2-22, साधू 1-24, दीप्ती शर्मा 1-19).