भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल
द.आफ्रिकेवर 23 धावांनी विजय, जेमिमाचे शतक, दीप्ती-स्मृती यांची अर्धशतके, अमनजोत कौरचे 3 बळी
वृत्तसंस्था/ कोलंबो
सामनावीर जेमिमा रॉडिग्सचे कारकिर्दीतील सर्वोत्तम शतक, स्मृती मानधना व दीप्ती शर्मा यांची अर्धशतके यांच्या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा 23 धावांनी पराभव करून महिलांच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता जेतेपदासाठी लंकेविरुद्ध भारताची लढत होणार आहे.
जेमिमाने 101 चेंडूत 123 धावांची फटकेबाजी खेळी करताना 15 चौकार व एक षटकार मारला. या बळावर भारताने 50 षटकांत 9 337 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाज अमनजोत कौर (3-59) व दीप्ती शर्मा (2-57) यांच्या भेदक माऱ्यापुढे द.आफ्रिकेला निर्धारित षटकांत 7 बाद 314 धावांपर्यंतच मजल मारता आली. अॅनेरी डर्कसनने 80 चेंडूत 81 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय हंगामी कर्णधार क्लो ट्रायॉनने 67 धावा नोंदवल्या. पण त्यांना इतरांची अपेक्षित साथ न मिळाल्याने द.आफ्रिकेला विजयापासून वंचित रहावे लागले.
भारताने राऊंड रॉबिन फेरीनंतर 4 सामन्यांत 6 गुण मिळविले तर लंकेचे 3 सामन्यांतून 4 गुण झाले आहेत. शुक्रवारी लंका व द.आफ्रिका यांच्यात सामना होणार असून लंकेने विजय मिळविल्यास त्यांना आणखी 2 गुण मिळतील. सलग तीन सामने गमविले असल्याने अंतिम फेरीच्या शर्यतीतून द.आफ्रिका संघ बाहेर पडला आहे.
भारताची फलंदाजीची ताकद पुन्हा एकदा या सामन्यात दिसून आली आणि त्यांनी 300 हून अधिक धावांची बरसात केली. 24 वर्षीय जेमिमाने अँकरिंग करीत दुसरे वनडे शतक नोंदवताना दोन महत्त्वाच्या भागीदारी केल्या. सलामीवीर स्मृती मानधनासमवेत तिने 99 चेंडूत 88 धावांची तर दीप्ती शर्मासमवेत 115 चेंडूत 122 धावांची भागीदारी केली. दीप्तीचे शतक केवळ 7 धावांनी हुकले. 43 व्या षटकात जेमिमा बाद झाली. ती बाद झाल्यानंतर दीप्तीने 84 चेंडूत 10 चौकार 2 षटकारांसह 93 धावा फटकावल्या. शेवटचा एक चेंडू असताना ती बाद झाली. द.आफ्रिकेच्या मसाबाता क्लास, नदिने डी क्लर्क व डावखुरी स्पिनर नॉनकुलुलेको म्लाबा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
कठीण आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेचा प्रारंभ खराब झाला. लारा गुडॉल (7) दुसऱ्याच षटकात बाद झाली. तझमिन ब्रिट्स (26) व मायने स्मिट (39) यांनी डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. भारतीय कर्णधार हरमनप्रीतने आपल्या गोलंदाजांचा हुशारीने वापर केल्याने द.आफ्रिकन फलंदाजांना मोठे फटके मारणे अवघड गेले. त्यामुळे त्यांना एकेरी-दुहेरी धावांवरच भर द्यावा लागला. आघाडीची फलंदाज अॅनेरी डर्कसनने 80 चेंडूत 81 धावा जमवित वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. सहाव्या गड्यासाठी तिने क्लो ट्रायॉनसमवेत 72 धावांची भागीदारी करीत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण धावगती वाढल्याने त्यांना धावांचा अपेक्षित वेग राखणे शक्य झाले नाही. दोन षटके असताना द.आफ्रिकेने 6 बाद 299 धावा जमविल्या होत्या. यावेळी अंधुक प्रकाशामुळे काहीवेळ खेळ थांबवण्यात आला होता. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर ट्रायॉन व डी क्लर्क यांनी आणखी 15 धावांची भर घातली. पण त्यांचे प्रयत्न विजयासाठी पुरेसे ठरले नाहीत.
भारताच्या डावात प्रतीका रावलने 1, रिचा घोषने 12 चेंडूत 20, अमनजोतने 5, श्री चरणीने 6, हरलीनने 4 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : भारतीय महिला 50 षटकांत 9 बाद 337 : स्मृती मानधना 51, हरमनप्रीत कौर 28, जेमिमा रॉड्रिग्स 101 चेंडूत 123, दीप्ती शर्मा 84 चेंडूत 93, रिचा घोष 12 चेंडूत 20, अवांतर 5, क्लास 2-51, डी क्लर्क 2-54, म्लाबा 2-71, डर्कसन 1-36, ट्रायॉन 1-46.
द.आफ्रिका महिला 50 षटकांत 7 बाद 314 : ब्रिट्स 26, स्मिट 39, डर्कसन 80 चेंडूत 81, शांगसे 36, सिनालो जाफ्ता 21, ट्रायॉन 43 चेंडूत 67, डी क्लर्क 13 चेंडूत नाबाद 22, लुस नाबाद 2, अवांतर 16. अमनजोत कौर 3-59, दीप्ती शर्मा 2-57, श्री चरणी 1-58, प्रतीका रावल 1-15.