भारतीय महिला संघाचा स्वीसवर विजय
वृत्तसंस्था /बुडापेस्ट
येथे सुरू असलेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये डी. हरिकाच्या पराभवानंतरही भारतीय महिला बुद्धिबळ संघाने स्वीत्झर्लंडचा (स्वीस) 3-1 अशा गुणांनी पराभव करत सहा गुणासह संयुक्त आघाडीचे स्थान पटकाविले. स्वीस विरुद्धच्या लढतीमध्ये भारतीय संघातील आर. वैशाली, दिव्या देशमुख, वनिता अगरवाल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले.
भारत आणि स्वीस यांच्या लढतीत पहिल्या पटावरील झालेल्या सामन्यात स्वीसच्या अॅलेक्सेंड्रा कोस्टिन्युकने द्रोणावली हरिकाचा पराभव करत पूर्ण गुण वसुल केला. त्यानंतर दुसऱ्या लढतीमध्ये भारताच्या आर. वैशालीने स्वीसच्या गझल हकिमीफर्दचा पराभव केला. दिव्या देशमूखने आपली विजयी घोडदौड कायम राखताना स्वीसच्या सोफिया हिरेझलोव्हाचा पराभव करत पूर्ण गुण मिळविला. चौथ्या पटावरील लढतीत वंटिका अगरवालने स्वीसच्या मारिलीया मॅनकोचा पराभव केला.
खुल्या विभागात भारतीय पुरूष संघाने हंगेरी ब संघावर सहज विजळ मिळविला. या लढतीत भारताच्या अर्जुन इरीगेसीने आक्रमक चाली खेळत हंगेरीच्या पीटर प्रोझास्काचा पराभव केला. विदीत गुजराती आणि पॅप गेबॉर यांच्यातील लढत बरोबरीत राहिली. भारताच्या भूपेशने अॅडम कोझॅक विरुद्धच्या लढतीत आपली स्थिती अधिक मजबूत राखली आहे. भारताच्या प्रग्यानंदने हंगेरीच्या टेमास बेनुसेझवर मात केली.