भारतीय महिलांचा सलग दुसरा पराभव
रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांचा 3 विकेट्सनी विजय : सामनावीर एलिसा हिलीची 142 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
कर्णधार अॅलिसा हिलीच्या शतकी खेळीनंतर एलिसा पेरीने केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिलांनी विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत वर्ल्डकप स्पर्धेत ऐतिहासिक विजय नोंदवला. अखेरच्या षटकात अमनजोत कौर आणि श्री चरणी यांनी टीम इंडियाच्या कमबॅकची आशा निर्माण केली, पण शेवटी टीम इंडिया कमी पडली आणि ऑस्ट्रेलियाने विक्रमी विजयाची नोंद केली. भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.
प्रारंभी, भारतीय संघाने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना एलिसा हिलीने 107 चेंडूत 142 धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ज्या एलिस पेरीने स्नायू दुखापतीमुळे मैदान सोडलं होत ती पुन्हा मैदानात उतरली आणि तिने 52 चेंडूत नाबाद 47 धावांची खेळी साकारली. याशिवाय सिक्स मारत संघाच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोघींशिवाय फीबी लिचफिल्ड 40 (39), गार्डनर 45 (46) यांनी उपयुक्त धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकात एलिस पेरीने स्नेह राणाने केलेल्या 49 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार मारत 3 विकेट आणि 6 चेंडू शिल्लक राखून संघाचा विजय निश्चित केला.
स्मृती, प्रतीकाचा अर्धशतकी धमाका
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारताकडून स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी डावाची सुरुवात केली. दोघींनी सुरुवातीला थोडा संयम दाखवला आणि नंतर धावांची गती वाढवली. यादरम्यान, 46 चेंडूत स्मृतीने तिचे या वर्ल्ड कपमधील पहिले अर्धशतक केले. दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या प्रतीकानेही आक्रमक शॉट्स खेळले.
स्मृती आणि प्रतीका यांनी 24 षटके खेळताना दीडशतकी भागीदारीही केली. स्मृती ज्या आक्रमकतेने खेळत होती, त्यावरून ती प्न्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करेल, असं वाटत होते. मात्र तिची प्रतिकासोबतची 155 धावांची भागादीरी सोफी मोलिनेक्सने तोडली. स्मृतीचा झेल फोबी लिचफिल्डने घेतला. स्मृतीने 66 चेंडूत 9 चौकर आणि 3 षटकारांसह 80 धावांची शानदार खेळी केली. पाठोपाठ प्रतिकाही 31 व्या षटकात बाद झाली. तिने 96 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 75 धावांचे योगदान दिले.
स्मृती-प्रतीका या दोघी बाद झाल्यानंत कर्णधार हरमनप्रीत कौर आणि हरलिन देओल चांगल्या सुरुवातीनंतर लगेचच बाद झाल्या. हरमनप्रीतने 17 चेंडूत 22 तर हरलिनने 42 चेंडूत 38 धावा फटकावल्या. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोषने आक्रमक खेळताना अर्धशतकी भागीदारी केली. पण त्या शेवटपर्यंत टिकू शकल्या नाहीत. रिचाला सदरलँडनेच 32 धावांवर जॉर्जिया वेअरहॅमच्या हातून झेलबाद केले. जेमिमाही 33 धावा करत माघारी परतली. त्यानंतर तळाच्या फलंदाज झटपट बाद झाल्याने भारतीय संघ 48.5 षटकात 330 धावांवर सर्वबाद झाला. पण जरी सर्वबाद झाला असला, तरी ही भारतीय महिला संघाची वनडे वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ
48.5 षटकांत सर्वबाद 330 (प्रतीका रावल 75, स्मृती मानधना 66 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारासह 80, हरलीन देओल 38, जेमिमा रॉड्रिग्ज 33, रिचा घोष 32, सदरलँड 5 बळी, मोलिनक्स 3 बळी).
ऑस्ट्रेलियन महिला संघ 49 षटकांत 7 बाद 331 (एलिसा हिली 107 चेंडूत 142, एलिस पेरी नाबाद 47, गार्डनर 45, मोलनिक्स 18, श्रीचरणी 3 बळी, अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा प्रत्येकी 2 बळी).
स्मृतीची विक्रमी कामगिरी
टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मानधना एका कॅलेंडर वर्षात महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. यापूर्वी इतर कोणत्याही महिला खेळाडूने हा पराक्रम केला नव्हता. याआधीचा सर्वोत्तम विक्रम ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता, ज्यांनी 1997 मध्ये महिलांच्या एकदिवसीय सामन्यात 80.83 च्या सरासरीने 970 धावा केल्या होत्या.
याशिवाय, स्मृती मानधनाने अवघ्या 112 डावांमध्ये 5,000 धावा पूर्ण केल्या. या कामगिरीसह तिने वेस्ट इंडिजची दिग्गज खेळाडू स्टेफनी टेलरचा (129 डाव) चा विक्रम मोडून काढला आहे. हा टप्पा गाठणारी ती जगातील पाचवी महिला क्रिकेटपटू ठरली आहे आणि भारताची महान खेळाडू मिताली राज नंतर 5,000 धावा पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू बनली आहे.