पहिल्याच दिवशी भारतीय महिलांचा धावांचा डोंगर
भारत वि इंग्लंड एकमेव महिला कसोटी : दिवसअखेरीस टीम इंडिया 7 बाद 410 : शुभा, जेमिमा, यास्तिका, दीप्तीची अर्धशतके
वृत्तसंस्था/नवी मुंबई
येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला संघात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. शुभा सतीश, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया व दीप्ती शर्मा यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पहिल्या दिवसअखेरीस 94 षटकांत 7 बाद 410 धावा केल्या. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दीप्ती शर्मा नाबाद 60 व पूजा वस्त्राकार 10 धावांवर खेळत होत्या.
प्रारंभी, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्मृती मानधना (17) व शेफाली वर्मा (19) यांना मोठी खेळी करता आली नाही. सलामीच्या दोन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर युवा फलंदाज शुभा सतीश व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या गड्यासाठी 115 धावांची भागीदारी केली. शुभाने 76 चेंडूत 13 चौकारासह 69 तर जेमिमाने 99 चेंडूत 11 चौकारासह 68 धावांचे योगदान दिले. अर्धशतक झाल्यानंतर ही शुभा व जेमिमा लागोपाठ बाद झाल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 81 चेंडूत 49 धावा केल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना मात्र तिची बॅट अडकली व रन आऊट होऊन ती माघारी परतली.
यास्तिका, दीप्तीची शानदार अर्धशतके
हरमनप्रीत बाद झाल्यानंतर यास्तिकाही लगेचच पॅव्हेलियनमध्ये परतली. हरमनप्रीत व यास्तिका यांनी पाचव्या गड्यासाठी 116 धावांची भागीदारी केली. यास्तिकाने 88 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह 66 धावा केल्या. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर दीप्ती शर्मानेही नाबाद अर्धशतक झळकावले. तिने 95 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह नाबाद 60 धावा केल्या. स्नेह राणाने 30 धावा करत तिला चांगली साथ दिली. राणा 30 धावा काढून बाद झाली. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाने 94 षटकांत 7 गडी गमावत 410 धावा केल्या होत्या. दीप्ती शर्मा 60 तर पूजा वस्त्राकार 4 धावांवर खेळत होत्या.
संक्षिप्त धावफलक : भारतीय महिला संघ पहिला डाव 94 षटकांत 7 बाद 410 (शुभा सतीश 69, जेमिमा रॉड्रिग्ज 68, हरमनप्रीत कौर 49, यास्तिका भाटिया 66, दीप्ती खेळत आहे 60, वस्त्रकार खेळत आहे 4, लॉरेन बेल 2 बळी, क्रॉस, ब्रंट, चार्ली डीन, एक्लेस्टोन प्रत्येकी एक बळी).
महिला संघाची विक्रमी कामगिरी, 88 वर्षानंतर असे दुसऱ्यांदा घडले
महिला कसोटी क्रिकेटच्या 88 वर्षाच्या इतिहासात कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 400 पेक्षा जास्त धावा करणारा भारतीय महिला संघ हा दुसरा संघ ठरला. याआधी, महिला कसोटी क्रिकेटमध्ये 1935 साली इंग्लंड आणि न्यूझीलंड सामन्यात पहिल्या दिवशी 475 धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 44 धावा करून माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडने दिवसअखेर 4 बाद 431 धावा केल्या होत्या. यानंतर तब्बल 88 वर्षानंतर 2023 मध्ये भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या पहिल्या दिवशीच 410 धावा केल्या.
कर्णधार हरमनप्रीत कौर पुन्हा विचित्र पद्धतीने धावचीत
इंग्लंडविरुद्ध सामन्यात हरमनप्रीतबाबत एक घटना घडली, ज्यामुळे चाहत्यांना 11 महिन्यांपूर्वीची घटना आठवली. टी-20 विश्वचषक स्पर्धेत हरमन ज्या विचित्र पद्धतीने धावबाद झाली त्याचीच पुनरावृत्ती या कसोटीतही झाली. हरमनप्रीतने चार्ली डीनच्या गोलंदाजीवर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीतरी विचार करून ती पुन्हा मागे परतली. हरमनप्रीत ज्या दिशेने मागे वळली त्या दिशेने इंग्लंडची क्षेत्ररक्षक डॅनिएल वॅटने थेट स्टंपवर थ्रो केला. इंग्लिश संघाने अपील केल्यावर मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवला. रिप्लेमध्ये हरमनप्रीत बाद असल्याचे दिसत होते. अशा पद्धतीने ती दुसऱ्यांदा बाद झाली आहे. याआधी महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ती बाद झाली होती.