For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

06:59 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांचा  पाकिस्तानवर दणदणीत विजय
Advertisement

विजयानंतरही सेमीफायनलचे टेन्शन कायम : पुढील दोन्ही लढतीत मोठ्या विजयाची गरज :

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय साकारत आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. भारताला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. पण रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. भारताने पाकिस्तानला 105 धावांवर रोखले. यानंतर विजयासाठी असलेले 106 धावांचे आव्हान लीलया पेलले आणि पाकला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह दोन गुणाची कमाई करत  गुणतालिकेत भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. 19 धावांत 3 बळी घेणाऱ्या भारताच्या अरुंधती रेड्डी ला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, टीम इंडियाचा पुढील सामना दि. 9 रोजी श्रीलंकेविरुद्ध होईल.

Advertisement

अरुंधती  रेड्डी श्रेयांका पाटीलसमोर पाकिस्तानचे लोटांगण

प्रारंभी, पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली, पण त्यांचा हा निर्णय किती अयोग्य होता हे भारताने दाखवून दिले. अरुंधती रेड्डी व श्रेयांका पाटील यांच्या शानदार गोलंदाजीसमोर पाकच्या फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्या. सलामीवीर गुल फिरोझाला भोपळाही फोडता आला नाही. रेणुका सिंगच्या अप्रतिम चेंडूवर ती त्रिफळाचीत झाली. यानंतर सिद्रा अमीनही (8 धावा) स्वस्तात बाद झाली. सिद्राला फिरकीपटू दीप्ती शर्माने बोल्ड केले. ओमाम्मा सोहेल (3) देखील फार काही करू शकली नाही आणि अरुंधती रेड्डी च्या चेंडूवर शेफालीकडे झेलबाद झाली. ओमायमा बाद झाली तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 33/3 अशी होती. यानंतर सेट फलंदाज मुनिबा अली (17 धावा) देखील पॅव्हेलियनमध्ये परतली, त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या 4 विकेटवर 41 धावा झाली. श्रेयंकाने मुनिबाला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर मधल्या फळीतील फलंदाज निदा दारने सर्वाधिक 34 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. तिने सईदा शाहसोबत आठव्या गड्यासाठी 28 धावांची भागीदारी साकारली व संघाला शतकी पल्ला गाठून दिला. इतर पाक फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरल्या. पाकला 8 बाद 105 धावापर्यंत मजल मारता आली.

हरमनप्रीत, शेफाली, जेमिमाची शानदार खेळी

पाकने दिलेल्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर स्मृती मानधना पाचव्या षटकात 7 धावा काढून बाद झाली. शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी डावाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. शेफाली वर्माने 35 चेंडूंत 3 चौकारांसह 32 धावा केल्या. जेमिमाने 28 चेंडूंचा सामना करत 23 धावांचे योगदान दिले. जेमिमा आणि त्यानंतर आलेली रिचा घोष लागोपाठ बाद झाल्या. दोघींना पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने तंबूत पाठवले. रिचा बाद झाली तेव्हा भारताची धावसंख्या चार विकेटवर 83 धावा होती. लागोपाठच्या चेंडूंवर दोन विकेट पडल्याने भारतीय संघ काहीसा दडपणाखाली आल्याचे दिसून आले. पण कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी भारतीय संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, विजयासाठी दोन धावांची गरज असताना हरमनप्रीत  दुखापतीमुळे निवृत्त झाली. हरमनप्रीतने 24 चेंडूत 29 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा 7 तर सजना सजीवन 4 धावांवर नाबाद राहिल्या.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान 20 षटकांत 8 बाद 105 (मुनिबा अली 17, निदा दार 28, फातिमा सना 13,सईदा शाह नाबाद 14, अरुंधती रे•ाr 19 धावांत 3 बळी, श्रेयांका पाटील 2 बळी, रेणुका सिंग, दीप्ती शर्मा व आशा प्रत्येकी 1 बळी).

भारत 18.5 षटकांत 4 बाद 108 (शेफाली वर्मा 32, जेमिमा 23, हरमनप्रीत दुखापतीने निवृत्त 29, दीप्ती शर्मा नाबाद 7, सजीवन नाबाद 4, फातिमा सना 2 बळी, सादिया व ओमायमा प्रत्येकी 1 बळी).

सेमीफायनलचे टेन्शन कायम

यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांनी पहिला विजय मिळवला खरा पण या विजयाचा गुणतालिकेत फारसा फायदा झालेला नाही. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला तर दुसऱ्या लढतीत संघाने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. आता, भारतीय संघाचे ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेविरुद्ध सामने बाकी आहेत. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या स्थानी असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, पाकिस्तान तिसऱ्या तर भारत चौथ्या व लंका पाचव्या स्थानी आहे. पाकविरुद्ध विजयाचा भारतीय संघाला फायदा झालेला नाही. टीम इंडियाचे रनरेट -1.217 असे मायनसमध्ये आहे. याउलट न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाचे रनरेट चांगले आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. याचाच अर्थ भारताला पुढील दोन्ही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील, एकही सामना हरला तर उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण होईल.

Advertisement
Tags :

.