भारतीय महिला रिकर्व्ह संघ कांस्यपदकाच्या फेरीत
वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिप : पुरुष रिकर्व्ह संघ, कंपाऊंड तिरंदाज अपयशी
वृत्तसंस्था/ ग्वांगजू, दक्षिण कोरिया
वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये दीपिका कुमारी, गाथा खडके, अंकिता भगत या भारतीय महिला रिकर्व्ह संघाने कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळविले तर पुरुष संघाला मात्र पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले. याशिवाय कंपाऊंड तिरंदाजांनाही आणखी पदके मिळविण्यात अपयश आले. त्यांनी याआधी दोन पदके मिळविली आहेत.
तिसऱ्या मानांकित भारतीय महिला त्रिकुटाने लागोपाठ दोन विजय मिळविल्यानंतर उपांत्य फेरीत जपानकडून त्यांना 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला. आता कांस्यपदकासाठी भारत व दक्षिण कोरिया यांच्यात होईल. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2015 नंतर सांघिक पदक मिळविणारा पहिला महिला संघ होण्याची त्यांना संधी आहे. भारताने आतापर्यंत दोन्ही पदके कंपाऊंड विभागात मिळविली असून पुरुष संघाने पहिल्यांदाच सांघिक सुवर्ण मिळविले तर मिश्र सांघिकमध्ये रिषभ यादव-ज्योती सुरेखा वेन्नम यांनी रौप्य मिळविले.
महिला रिकर्व्हमध्ये माजी जागतिक अग्रमानांकित दीपिकाने पुढाकार घेत पात्रता फेरीत 677 गुणांसह सहावे स्थान मिळविले. अंकिताने 656 गुणांसह 30 वे तर गाथाने 666 गुण घेत 14 वे स्थान मिळविल्याने सांघिक पात्रतेमध्ये तिसरे घेतले आणि थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. या त्रिकुटाने दहाव्या मानांकित स्लोव्हेनियाला 5-1 असे हरविल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तुर्कीविरुद्ध पहिला सेट 51-55 असा गमविला, पण त्यानंतर दमदार प्रदर्शन करीत 55 व 57 गुण घेत बाजी पलटवली आणि आणखी एकदा 55 गुणांची नोंद करीत ही लढत 6-2 अशी जिंकली.
उपांत्य फेरीत मात्र त्यांची घोडदौड जपानने रोखली. पहिल्या सेटमध्ये 56-56 अशी बरोबरी झाल्यानंतर जपानने 58 गुण घेत 3-1 अशी आघाडी मिळविली. तिसरा सेट पुन्हा 56-56 असा टाय झाला. पण चौथ्या सेटमध्ये जपानची 54 गुणावर घसरण झाली. मात्र भारताला याचा लाभ घेता आला नाही. त्यांनी या सेटमध्ये 51 गुण नोंदवल्याने भारताला ही लढत गमवावी लागली आणि जपानला अंतिम फेरीत स्थान मिळाले. चिनी तैपेईविरुद्ध त्यांची सुवर्णपदकाची लढत होईल. तैपेईनेही दक्षिण कोरियाला शूटऑफमध्ये पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. पुरुष सांघिक रिकर्व्हमध्ये भारताला नववे मानांकन मिळाले होते. पण नीरज चौहान (670), धीरज बोम्मदेवरा (669), राहुल (657) यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. 24 व्या मानांकित डेन्मार्कने शूटऑफमध्ये त्यांना 5-4 असे हरविले. भारताने 26 तर डेन्मार्कने 28 गुण नोंदवले.
महिलांच्या सांघिक कंपाऊंडमध्येही भारताला पराभव स्वीकारावा लागला. ज्योती, परनीत कौर, पृथिका प्रदीप यांना वैयक्तिक पदकही जिंकता आले नाही. कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये परनीत कौरने प्रभावी कामगिरी केली. पण कोलंबियाच्या अलेजांद्रा उस्कियानोच्या सरस कामगिरीमुळे भारताला 144-145 अशी ही लढत गमवावी लागली.
परनीतला वैयक्तिक विभागात उपांत्य फेरीत सोफिया पाएझने तिला 143-142 असे हरविले. पृथिका प्रदीपला उपउपांत्यपूर्व फेरीतच इस्टोनियाच्या लिजेल जातमाने 148-145 असे हरविले. बर्लिनमध्ये 2023 मध्ये झालेल्या याआधीच्या स्पर्धेत भारताने वैयक्तिक सुवर्ण मिळविले होते. आदिती स्वामीने हे पदक जिंकले होते. पण यावेळी भारताला ते राखता आले नाही. आता मिश्र सांघिक रिकर्व्ह तिरंदाजांकडून भारताला आशा करता येईल.