महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय महिलांची वनडेत विक्रमी धावसंख्या

06:58 AM Jan 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिसऱ्या वनडेत तब्बल 304 धावांनी विजय : मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश : प्रतिका रावल-स्मृती मानधनाची शतके

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

Advertisement

प्रतिका रावल (154) व स्मृती मानधना (135) यांच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या वनडेत आयर्लंडवर 304 धावांनी विक्रमी विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी आयर्लंडला मालिकेत 3-0 असे व्हाइटवॉश केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी वनडे क्रिकेटमधील 435 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. विजयासाठीच्या बलाढ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 131 धावांत ऑलआऊट झाला. या विजयासह टीम इंडियाने सर्वात मोठ्या वनडे धावसंख्येनंतर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजयाची नोंद केली. मालिकेत धावांची बरसात करणाऱ्या युवा फलंदाज प्रतिका रावलला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रारंभी, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला आणि भारतीय संघाने 50 षटकांत 5 गडी गमावून 435 धावा केल्या. महिला एकदिवसीय सामन्यात 400 धावांचा टप्पा पार करणारा भारतीय संघ पहिला आशियाई संघ आहे. टीम इंडियाने मागील सामन्यातही 370 धावसंख्या उभारली होती. यादरम्यान सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी शतकी खेळी केल्या. त्याचवेळी यष्टीरक्षक रिचा घोषनेही 59 धावांची आक्रमक खेळी केली. याशिवाय, तेजल हसबनीसने 28, दीप्ती शर्माने नाबाद 11 धावा केल्या.

आयर्लंडचा 304 धावांनी उडवला धुव्वा

436 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिश संघाची सुरुवात खूपच खराब झाली. आयर्लंडचा संघ केवळ 31.4 षटकेच खेळू शकला आणि 131 धावा करून सर्वबाद झाला. यादरम्यान एकाही आयरिश फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही. सारा फोर्ब्सने सर्वाधिक 41 धावा केल्या तर प्रेंडरगास्टने 36 धावांचे योगदान दिले. इतर आयरिश फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. दीप्ती शर्माने टीम इंडियाकडून सर्वाधिक 3 विकेट घेतले. तनुजा कंवर हिलाही 2 विकेट मिळवण्यात यश आले. तितास साधू, सायली सातघरे, मिन्नू मणी यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला संघ 50 षटकांत 5 बाद 435 (प्रतिका रावल 154, स्मृती मानधना 135, रिचा घोष 59, तेजल 28, प्रेंडनगास्ट दोन बळी, केली, सॅरगंट व डेम्सी प्रत्येकी एक बळी).

आयरिश महिला संघ 31.4 षटकांत सर्वबाद 131 (सारा फोर्ब्स 41, प्रेंडरगास्ट 36, दीप्ती शर्मा 3 तर तनुजा कंवर 2 बळी).

टीम इंडियाची रेकॉर्डब्रेक धावसंख्या

प्रतिका रावल व स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत तब्बल 435 धावा कुटल्या. वनडे क्रिकेटमध्ये प्रथमच भारतीय संघाने चारशेचा टप्पा गाठताना ही ऐतिहासिक धावसंख्या उभी केली. यापूर्वी, भारतीय महिलांची सर्वोच्च धावसंख्या 370 धावा होती, जी आयर्लंडविरुद्धच्या याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आली होती. महिला वनडे क्रिकेटमध्ये फक्त सहावेळा संघांना 400 पार धावा करता आल्या आहेत. न्यूझीलंडने सर्वाधिक चार वेळा हा टप्पा ओलांडला आहे. तर भारत व ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एकवेळा ही कामगिरी करता आली आहे. विशेष म्हणजे, भारतीय महिलांची ही कामगिरी ऐतिहासिक अशी ठरली आहे. 435 धावांचा डोंगर उभा करताना भारतीय पुरुष संघालाही मागे टाकण्याची किमया केली आहे. भारतीय पुरुष संघाची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 418 अशी आहे.

महिला वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या

491/4 - न्यूझीलंड वि आयर्लंड, डब्लिन, 2018

455/5 - न्यूझीलंड वि पाकिस्तान, क्राइस्टचर्च, 1997

440/3 - न्यूझीलंड वि आयर्लंड, डब्लिन, 2018

435/5 - भारत वि आयर्लंड, राजकोट, 2025

418 - न्यूझीलंड वि आयर्लंड, डब्लिन, 2018.

स्मृती मानधनाचे वनडेत नवे रेकॉर्ड

आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत स्मृती मानधनाने 80 चेंडूत 12 चौकार व 7 षटकारासह 135 धावांची दणकेबाज खेळी साकारली. तिचे हे वनडेतील 10 वे शतक ठरले. यासह महिला एकदिवसीय सामन्यात 10 शतके करणारी मानधना पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्यानंतर मिताली राजने भारताकडून खेळताना 7 शतके झळकावली आहेत. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नावावर आहे. लॅनिंगने 15 शतके केली आहेत तर सुझी बेट्सच्या नावावर 13 शतके आहेत. टॅमी ब्यूमोंट आणि स्मृती मानधना यांच्या नावावर प्रत्येकी 10 शतके आहेत.

टीम इंडियासाठी स्मृतीचे वेगवान शतक

स्मृती मानधनाने आयर्लंडविरुद्ध शतक करण्यासाठी फक्त 70 चेंडू घेतले. हे कोणत्याही भारतीय महिला फलंदाजाचे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी हा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर होता. तिने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 चेंडूत हा विक्रम केला होता.

युवा फलंदाज प्रतिका रावलची अफलातून खेळी

राजकोट येथील तिसऱ्या वनडे सामन्यात युवा फलंदाज प्रतिका रावलने आयरिश गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना 129 चेंडूत 20 चौकार व 1 षटकारासह 154 धावांची अफलातून खेळी साकारली. प्रतिका आता भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळी खेळणारी तिसरी फलंदाज ठरली आहे. दीप्ती शर्माने भारतीय संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आहे. तिने 2017 मध्ये आयर्लंडविरुद्ध 188 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्येच हरमनप्रीत कौरने नाबाद 171 धावांची शानदार खेळी केली होती. आता प्रतिका रावलने 154 धावा करत तिसरे स्थान मिळवले आहे.

 

Advertisement
Next Article