पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिलांची सरशी
विंडीजवर 49 धावांनी मात, सामनावीर रॉड्रिग्स, मानधना यांची दमदार अर्धशतके
वृत्तसंस्था / नवी मुंबई
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारी येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान भारतीय महिला संघाने विंडीजचा 49 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारताने विंडीजला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. स्मृती मानधना आणि जेमीमा रॉड्रिग्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 20 षटकात 4 बाद 195 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 7 बाद 146 धावा जमविल्या. जेमीमा रॉड्रिग्सला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. स्मृती मानधना आणि उमा छेत्री या सलामीच्या जोडीने 39 चेंडूत 50 धावांची भागिदारी केली. छेत्रीने 26 चेंडूत 4 चौकारांसह 24 धावा जमविल्या. छेत्री बाद झाल्यानंतर रॉड्रिग्स आणि मानधना यांनी दुसऱ्या गड्यासाठी 42 चेंडूत 81 धावांची भागिदारी केली. मानधनाने 33 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 54 धावा झळकविल्या. मानधनाने आपले अर्धशतक 30 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकविले. रॉड्रिग्सने 35 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 73 धावांची खेळी केली. घोषने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. रॉड्रिग्स एकेरी धाव घेण्याच्या नादात शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर धावचीत झाली. कर्णधार कौर 11 चेंडूत 1 चौकारांसह 13 धावांवर नाबाद राहिली. रॉड्रिग्सने आपले अर्धशतक 28 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 50 धावा जमविल्या. भारताचे शतक 70 चेंडूत, दीडशतक 93 चेंडूत फलकावर लागले. विंडीजतर्फे करिश्मा रामहॅरेकने 18 धावांत 2 तर डॉटीनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात क्विना जोसेफने 38 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 49 तर डॉटीनने 26 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 52 धावा झळकविल्या. सलामीची फलंदाज आणि कर्णधार मॅथ्युज केवळ 1 धावेवर बाद झाली. कॅम्पबेलने 9 चेंडूत 2 चौकारांसह 13 तर हेन्रीने 7, गजनबीने 15 धावा केल्या. जेम्सने 5 धावा जमविल्या. भारतातर्फे तितास साधूने 37 धावांत 3 तर दीप्ती शर्माने 21 धावांत 2 आणि राधा यादवने 28 धावांत 2 गडी बाद केले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 35 धावा जमविताना 1 गडी गमविला. विंडीजचे अर्धशतक 43 चेंडूत तर शतक 74 चेंडूत फलकावर लागले. डॉटीनने 26 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. विंडीजच्या डावात 6 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: भारत 20 षटकात 4 बाद 195 (जेमीमा रॉड्रिग्स 73, स्मृती मानधना 54, उमा छेत्री 24, रिचा घोष 20, हरमनप्रित कौर नाबाद 13, सजना नाबाद 1, अवांतर 10, रामहॅरेक 2-18, डॉटीन 1-37), विंडीज 20 षटकात 7 बाद 146 (जोसेफ 49, डॉटीन 52, कॅम्पबेल 11, हेन्री 7, गजनबी 15, मॅथ्युज 1, अवांतर 2, तितास साधू 3-37, दीप्ती शर्मा 2-21, राधा यादव 2-28)