भारतीय महिला हॉकी संघ दहाव्या स्थानी
वृत्तसंस्थ्ाा / सॅन्टीयागो (चिली)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची कामगिरी निकृष्ठ झाली असून त्यांना दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील तळाच्या स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात स्पेनने भारताचा 2-1 असा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात स्पेनतर्फे व्हिलानोव्हाने 16 व्या मिनिटाला तर इस्थेर कॅनालेसने 36 व्या मिनिटाला गोल केले. भारतातर्फे कनिका सिवाचने 41 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला. हा सामना नवव्या आणि दहाव्या स्थानासाठी खेळविला गेला होता.
सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांकडून खाते उघडले गेले नाही. मात्र 16 व्या मिनिटाला नातालिया व्हिलानोव्हाने मैदानी गोल करुन स्पेनचे खाते उघडले. स्पेनला 14 व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण भारताची गोलरक्षक निधीने तो थोपविला. मध्यंतरापर्यंत स्पेनने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर सहाव्याच मिनिटाला स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कॅनालेसने या संधीचा फायदा घेत स्पेनची आघाडी वाढविली. 41 व्या मिनिटाला भारताला पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. दरम्यान एका कॉर्नरवर कनिका सिवाचने गोल नोंदवित स्पेनची आघाडी थोडी कमी केली. मात्र त्यानंतर शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने बरोबरी करण्यासाठी प्रयत्नांशी शिकस्त केली. पण स्पेनच्या भक्कम बचावफळीने भारताला रोखण्यात यश मिळविले