भारतीय महिला हॉकी संघाची विजयी सलामी
आशिया चषक महिला हॉकी स्पर्धा : थायलंडवर 11 गोलांनी दणदणीत विजय
वृत्तसंस्था/ हांगझोयु (चीन)
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या मोहीमेला दणदणीत विजयाने प्रारंभ केला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा 11-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
या सामन्यात भारतातर्फे उदिताने 30 व्या आणि 52 व्या मिनिटाला असे दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. डुंगडुंगने 45 व्या आणि 54 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. मुमताझ खानने 7 व्या, संगीता कुमारीने 10 व्या, नवनीत कौरने 16 व्या, लालरेमसियामीने 18 व्या, टी. सुमनदेवीने 49 व्या, शर्मला देवीने 57 व्या आणि ऋतुजा पिसाळने 60 व्या मिनिटाला गोल केले. ब गटातील या सामन्यात भारतीय महिला संघाने मध्यंतरापर्यंत थायलंडवर 5-0 अशी आघाडी मिळविली होती.
या सामन्यात भारताला एकूण 9 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि त्यापैकी 5 कॉर्नर्सवर गोल नोंदविले गेले. मात्र थायलंडला या सामन्यात एकही पेनल्टी कॉर्नरची संधी मिळू शकली नाही. सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत मुमताझ आणि संगीता यांनी भारताचे दोन गोल केले. सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघाने अधिक आक्रमक खेळावर भर देत आणखीन तीन गोल केले. अनुभवी नवनीत आणि मध्यफळीतील लालरेमसियामी यांनी प्रत्येकी एक मैदानी गोल केला. त्यानंतर मध्यंतराला केवळ 1 मिनिट बाकी असताना उदिताने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा पाचवा गोल नोंदविला. सामन्याच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने 4 पेनल्टी कॉर्नर मिळविले. त्यापैकी 45 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर डुंगडूंगने गोल केला. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय आघाडी फळीने आक्रमक चढाया करत आणखी पाच गोल नोंदवित थायलंडचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. मुमताझ, उदिता आणि शर्मिला यांनी पेनल्टी कॉर्नरवर तर डुंगडूंग आणि ऋतुजा यांनी मैदानी गोल केले.
या स्पर्धेत एकूण आठ संघांचा समावेश असून ते दोन गटात विभागण्यात आले आहेत. अ आणि ब गटात प्रत्येकी चार संघ असून या गटातील आघाडीचे पहिले दोन संघ सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-4 फेरीमध्ये आघाडीच्या दोन संघांमध्ये अंतिम सामना 14 सप्टेंबरला खेळविला जाईल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय महिला हॉकी संघामध्ये दुखापतग्रस्त गोलरक्षक सविता पुनिया आणि दीपिका यांना सहभागी होता आले नाही. आशिया चषक हॉकी स्पर्धेतील विजेता संघ 2026 मध्ये बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या विश्वचषक महिलांच्या हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल. आता भारतीय महिला हॉकी संघाचा या स्पर्धेतील पुढील सामना जपानबरोबर शनिवारी खेळविला जाणार आहे. ब गटातील भारताचा शेवटचा सामना सिंगापूरबरोबर सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजी खेळविला जाईल.