भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ मस्कत
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या हॉकी फाईव्हज महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने द. आफ्रिकेचा 6-3 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. रविवारी भारत आणि नेदरलँड्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतातर्फे अक्षता ढेकळेने सातव्या मिनिटाला आपल्याच संघाचे खाते उघडले. मारियाना कुजुरने 11 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल तर मुमताज खानने 21 व्या मिनिटाला तिसरा तसेच ऋतुजा पिसाळने 23 व्या मिनिटाला भारताचा चौथा ज्योती छेत्रीने 25 व्या मिनिटला पाचवा आणि अजिमा कुजुरने 26 व्या मिनिटाला भारताचा सहावा आणि शेवटचा गोल नोंदवत द. आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आणले. द. आफ्रिकेतर्फे पाचव्या मिनिटाला तेशॉन रे, आठव्या मिनिटाला कर्णधार टोनी मार्क्सने तर 29 व्या मिनिटाला डिर्की चेंबरलीनने तिसरा गोल केला. सामन्याच्या पूर्वार्धात भारताचे सहा गोल तर द. आफ्रिकेचे तीन गोल नांदवले गेले. मात्र, उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नाही.