भारतीय महिला हॉकी संघाची हार
वृत्तसंस्था/ लंडन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो-लीग महिलांच्या हाकी स्पर्धेतील युरोपीयन टप्प्यात येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ब्रिटनने भारतीय महिला हॉकी संघावर 3-2 असा निसटता विजय मिळविला,
या सामन्यात पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत ब्रिटनतर्फे 2 गोल नोंदविले गेले. 5 व्या मिनिटाला चार्लोटीने पेनल्टी स्ट्रोकवर ब्रिटनचे खाते उघडले. 6 व्या मिनिटाला चार्लोटीने मैदानी गोल करुन ब्रिटनला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत 2 गोलांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघातील नवनीत कौरने 34 व्या मिनिटाला तर शर्मिला देवीने 57 व्या मिनिटाला गोल नोंदवित आपल्या संघाला 2-2 असे बरोबरीत नेले. सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ब्रिटनच्या इसाबेलीने या कॉर्नरवर तिसरा आणि निर्णायक गोल करुन भारताचे आव्हान संपुष्टात आणले. युरोपियन दौऱ्यामध्ये भारतीय महिला हॉकी संघाला यापूर्वी बेल्जियम आणि अर्जेंटिना संघांकडून हार पत्करावी लागली होती. आता भारतीय महिला हॉकी संघाचा पुढील सामना जर्मनी बरोबर 8 जूनला होणार आहे.