भारतीय महिला फुटबॉल संघाचा एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/ थिंपू
17 वर्षाखालील वयोगटातील महिलांच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या सामन्यात भारताने भूतानचा 8-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील अनुष्का कुमारीने शानदार हॅट्ट्रीक साधली. या स्पर्धेतील भारतीय महिला फुटबॉल संघाचा हा सलग तिसरा विजय आहे.
भारत आणि भूतान यांच्यातील रविवारचा हा सामना एकतर्फी झाला. या सामन्यात भूतानला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. भारतातर्फे अनुष्का कुमारीने 53 व्या, 61 व्या आणि 73 व्या मिनिटाला असे 3 गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. अभिस्ता बेसनेटने 23 व्या आणि 89 व्या असे दोन गोल केले. पर्ल फर्नांडीसने 71 व्या, दिव्यानी विंडाने 77 व्या आणि व्हॅलेना फर्नांडीसने 92 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने भूतानवर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात खेळाच्या उत्तरार्धात 7 गोल केले. या स्पर्धेमध्ये भारतीय महिला फुटबॉलपटूंनी 3 सामन्यात एकूण 17 गोल नोंदविले असून एकही गोल स्वत:वर करवून घेतलेला नाही. स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर असून आता हा संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाने या स्पर्धेत 3 सामन्यातून 9 गुणासह आघाडीचे स्थान घेतले आहे. बांगलादेश आणि नेपाळ यांनी या स्पर्धेत प्रत्येकी 3 गुण मिळविले असून भूतानला आपले खातेही उघडता आलेली नाही.
सामना सुरु झाल्यानंतर 5 व्या मिनिटाला भारताच्या श्वेता राणीने शानदार चाल रचत भूतानच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. पण तिचा थेट फटका भूतानच्या गोलरक्षकाने व्यवस्थितपणे थोपविला. त्यानंतर दिव्यानी लिंडाने मिळालेल्या पासवर निरा छानूकडे चेंडू लाथाडला. पण निराचा फटका पुन्हा भूतानच्या गोलपोस्टने अडविला. पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत भूतानच्या बचावफळीने भक्कम खेळ करत भारताला खाते उघडण्यापासून रोखले. 23 व्या मिनिटाला अभिस्ता बेसनेटने भूतानच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचे खाते उघडले. भारताचा दुसरा गोल 53 व्या मिनिटाला अनुष्का कुमारीने केला. 61 व्या मिनिटाला अनुष्का कुमारीने स्वत:चा वैयक्ति दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदविला. 71 व्या मिनिटाला पर्ल फर्नांडीसने भारताचा चौथा गोल केला. 73 व्या मिनिटाला भारताचा पाचवा तसेच स्वत:चा वैयक्तिक तिसरा गोल अनुष्का कुमारीने केला. 77 व्या मिनिटाला दिव्यानी लिंडाने भारताचा सहावा गोल केला. बेसनेटने भारताचा सातवा गोल 89 व्या मिनिटाला नोंदविला. व्हॅलेना फर्नांडीसने 92 व्या मिनिटाला भारताचा आठवा गोल नोंदवून भूतानचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.