भारतीय महिला फुटबॉल संघ पात्र
वृत्तसंस्था/ चीयांगमेई (थायलंड)
2026 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाने पहिल्यांदाच आपली पात्रता सिद्ध केली आहे. येथे झालेल्या पात्र फेरी स्पर्धेतील सामन्यात भारताने यजमान थायलंडचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला.भारतीय महिला फुटबॉल संघाने फुटबॉल क्षेत्रात पहिल्यांदाच हा नवा इतिहास घडविला आहे. एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताने आपले तिकीट आरक्षित केले आहे. यापूर्वी म्हणजे 2003 साली भारतीय महिला फुटबॉल संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
भारत आणि थायलंड यांच्यातील झालेल्या या सामन्यात संगीताने 2 गोल केले. संगीताचा पहिला गोल 28 व्या मिनिटाला तर दुसरा गोल 74 व्या मिनिटाला नोंदविला गेला. थायलंडतर्फे एकमेव गोल 47 व्या मिनिटाला सी. रॉडथोंगने केला. या पराभवामुळे थायलंडचे आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रतेचे आव्हान संपुष्टात आले आहे.