भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत
वृत्तसंस्था/काठमांडू (नेपाळ)
येथे सुरू असलेल्या 2024 च्या आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या महिलांच्या सॅफ चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्यफेरीत समाप्त झाले. अटीतटीच्या उपांत्य सामन्यात यजमान नेपाळने भारताचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला.
या सामन्याला शौकीनांची चांगलीच गर्दी झाली होती. दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. या सामन्यात 62 व्या मिनिटाला संगीत बेसफोरने शानदार गोल करुन भारताचे खाते उघडले. त्यानंतर नेपाळने आक्रमक चालीवर भारतीय गोलपोस्ट दिशेने मुसंडी मारत गोल नोंदविला. पण पंचांनी तो नियमबाह्य ठरविल्याने नेपाळची निराशा झाली. या सामन्यात भारताने 72 मिनिटांपेक्षा अधिक नेपाळवर एका गोलाची आघाडी मिळविली होती. नेपाळच्या सबित्रा भंडारीने सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना गोल करुन भारताशी बरोबरी साधली. निर्धारित वेळेत आणि त्यानंतर जादावेळेत ही गोल कोंडी कायम राहिल्याने पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये नेपाळतर्फे 4 गोल तर भारतातर्फे मनीषा आणि करिश्मा शिरवईकर यांनी गोल केले. कर्णधार आशालता देवी व रंजना छानू यांना मात्र गोल करता आले नाही. आता नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. अन्य एका उपांत्य सामन्यात बांलगादेशने भूतानचा 7-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला.