भारतीय महिला फुटबॉल संघ जाहीर
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
संयुक्त अरब अमिरातमधील शारजा येथे 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पिंक लेडीज चषक मित्रत्वाच्या महिलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने 23 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाची प्रशिक्षक क्रिस्पीन छेत्रीने सोमवारी संघ जाहीर केला.
शारजामध्ये होणाऱ्या या आगामी स्पर्धेत भारताचा पहिला सामना जॉर्डन बरोबर 20 फेब्रुवारीला, दुसरा सामना रशियाबरोबर 23 फेब्रुवारीला तर तिसरा सामना कोरिया प्रजासत्ताक संघाबरोबर 26 फेब्रुवारीला खेळविला जाणार आहे. हे सर्व सामने शारजाच्या अल हमरिया स्पोर्टस क्लब स्टेडियममध्ये खेळविले जातील. सध्या भारतीय महिला फुटबॉल संघासाठी आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. 2027 साली होणाऱ्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेसाठी मे-जून 2025 मध्ये सामने खेळविले जाणार असून भारतीय महिला फुटबॉल संघाने आतापासूनच आपल्या पूर्व तयारीला प्रारंभ केला आहे. भारतीय महिला फुटबॉल संघ मंगळवारी शारजाकडे प्रयाण करेल.
भारतीय महिला फुटबॉल संघ - गोलरक्षक- पी. छानू, पायल, बासूडे, श्रेया हुडा, बचावफळी- अरुणा बाग, किरन पिसदा, टी. मार्टीना, पी. निर्मलादेवी, पूर्णिमा कुमारी, संजू, एच. शिल्कीदेवी, एन. स्वीटीदेवी, मध्यफळी- एल. बबिनादेवी, ग्रेस डेंगमेई, मौसमी मुर्मू, एस. प्रियदर्शिनी, प्रियांकादेवी, एन. रत्नबालादेवी, आघाडीफळी- करिश्मा शिरवईकर, लिंडा कॉम, मनिषा, रेणू, आर. संध्या, जी. सौम्या.