भारतीय महिलांचा आज दक्षिण आफ्रिकेशी अंतिम मुकाबला
प्रतिनिधी/ नवी मुंबई
भारतीय महिला क्रिकेट एका निर्णायक क्षणाच्या उंबरठ्यावर असून ते पुऊषांच्या 1983 च्या ऐतिहासिक विजयाची आठवण करून देत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आज रविवारी येथे होणाऱ्या महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना आयसीसी करंडकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करून उतरेल.

तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेला भारत आणि पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेला दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ही अंतिम फेरी रंगणार असल्याने 13 व्या विश्वचषक स्पर्धेला नवीन विजेता लाभेल हे स्पष्ट आहे. दोन्ही संघाची मोहीम उल्लेखनीय राहिलेली आहे. जेतेपद मिळाल्यास भारतात महिला क्रिकेटमध्ये अभूतपूर्व रस निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तऊण मुलींच्या नवीन पिढीला हा खेळ स्वीकारण्यास प्रेरणा मिळू शकते. तीन हंगामांपूर्वी महिला प्रीमियर लीगचे आगमन झाल्यानंतर मिळालेल्या प्रेरणेपेक्षा ही प्रेरणा जास्त असेल. परंतु यजमानांना तीन रात्री आधी येथे झालेल्या भावनिकदृष्ट्या थकवणाऱ्या उपांत्य फेरीच्या विजयाला मागे टाकून लवकर पुढे जावे लागेल. सदर विजयाने त्यांना चषकाचे भक्कम दावेदार बनविले आहे.
जेमिमा रॉड्रिग्जच्या अविस्मरणीय नाबाद 127 धावा आणि हरमनप्रीतच्या धाडसी 89 धावा आणि सात वेळा विजेत्या राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा अनियमित खेळ यामुळे भारत आणखी एका अंतिम सामन्यात पोहोचला आहे. मात्र अशा स्तरावर अनेकदा हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. 2017 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडकडून भारताचा नऊ धावांनी झालेला पराभव अजूनही त्या मोहिमेचा भाग राहिलेल्यांसाठी वेदनादायक आहे. यामध्ये हरमनप्रीतचाही समावेश होतो. त्यानंतर 2023 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पाच धावांनी पराभव झाला होता आणि 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात त्याच प्रतिस्पर्ध्यासमोर आणखी एक धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता.
भारतासाठी ही लढाई आता कौशल्य किंवा फॉर्म सिद्ध करण्याची नाही, तर अंतिम अडथळा पार करण्याची आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर भारताने माजी विजेते न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियावर जबरदस्त विजय मिळवून त्यांच्या घरच्या भूमीवरील मोहिमेला पुनऊज्जीवित केले. जेव्हा अत्यंत गरज होती तेव्हा त्यांनी त्यांची चमक पुन्हा शोधली. उपांत्य फेरी अनेकदा संघांना भावनिकदृष्ट्या थकवू शकते आणि त्या यशस्वी पाठलागानंतर भारताला लवकर सावरून सज्ज व्हावे लागेल. भारतीय संघाचा विचार करता तिसऱ्या क्रमांकावरील जेमिमा रॉड्रिग्ज एक ताकदवान खेळाडू म्हणून उदयास आली आहे. तिच्या शौर्यामुळे आता अपेक्षा वाढल्या आहेत.
उपांत्य फेरीत भारताला त्यांची सर्वोत्तम फलंदाज स्मृती मानधना (385 धावा) चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी त्यांना जेमिमाच्या रूपात एक नायिका सापडली. डी. वाय. पाटील स्टेडियमची पाटा खेळपट्टी भरपूर धावसंख्येसाठी आणि संध्याकाळी दव पडण्यासाठी ओळखली जाते. भारताच्या क्षेत्ररक्षणाची आणि शिस्तबद्ध माऱ्याची चाचणी घेणारी आणखी एक धावसंख्या येथे पाहायला मिळू शकते. शकते. भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली, परंतु तो विजय निर्दोष नव्हता. त्यात मध्यमगती गोलंदाज क्रांती गौड आणि रेणुका सिंह ठाकूर यांनी लयीसाठी संघर्ष केला आणि कर्णधार हरमनप्रीतनेही एक झेल सोडला.
फलंदाजीसाठी अनुकूल अशा मैदानांवर गोलंदाज फार काही करू शकत नाहीत. परंतु स्पर्धेत सर्वाधिक 17 बळी घेणारी दीप्ती शर्मा पुन्हा एकदा भारताच्या यशाची गुऊकिल्ली ठरेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला अंडरडॉग संबोधण्यास हरकत नाही. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय लवचिकता दाखवली आहे. गुवाहाटीमध्ये इंग्लंडविऊद्ध 69 धावांवर सर्व बाद होण्यापासून त्याच ठिकाणी त्याच प्रतिस्पर्ध्याला हरवण्यापर्यंत आणि इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध 97 धावांत डाव आटोपल्यानंतर त्यातून सावरून पुनरागमन करण्यापर्यंत त्यांनी मोठी झेप घेतली आहे. अनुभवी मॅरिझान कॅप (204 धावा, 12 बळी), नॅडिन डी क्लार्क (190 धावा, 8 बळी), ताझमिन ब्रिट्स (212 धावा), क्लोई ट्रायन (167 धावा, 5 बळी) आणि कर्णधार लॉरा वोल्वार्ड (470 धावा) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतसे वोल्वार्डचे सातत्य आणि नेतृत्व केंद्रस्थानी आले आहे आणि वरच्या फळीत ब्रिट्ससमवेतची तिची जोडी भारतीय गोलंदाजांसाठी एक मोठे आव्हान निर्माण करेल. डावखुरी फिरकी गोलंदाज नोनकुलुलेको म्लाबा (12 बळी) भारताच्या फलंदाजीची परीक्षा घेईल. दक्षिण आफ्रिकेची सामूहिक चिकाटी दबावाने भरलेल्या अंतिम फेरीत निर्णायक ठरू शकते. या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रेरणादायी वळण घेतलेले असून पुरुष नि महिला संघांचा तसेच विविध वयोगटांचा विचार करता ही त्या देशाने गाठलेली आयसीसी स्पर्धांची सलग पाचवी अंतिम फेरी आहे.
गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषक अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर एक पाऊल पुढे जाण्याची त्यांची भूक प्रचंड आहे. शेवटी कोणता संघ दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो यावर सारे अवलंबून असेल. हरमनप्रीत कौरसाठी कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहासात आपले नाव कोरण्याची ही शेवटची संधी असू शकते.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.