भारतीय महिला क्रिकेट संघाचा मालिका विजय
वृत्तसंस्था/ बेंगळूर
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉशच्या नामुष्किला सामोरे जावे लागले. या मालिकेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघातील सलामीची फलंदाज स्मृती मानधनाचे या मालिकेतील सलग तिसरे शतक केवळ 10 धावांनी हुकले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 8 बाद 215 धावा जमवित भारताला 216 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताने 40.4 षटकात 4 बाद 220 धावा जमवित हा सामना 56 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी जिंकला. रिचा घोषने विजयी षटकार खेचला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात कर्णधार वुलव्हर्टने 57 चेंडूत 7 चौकारांसह 61 धावा जमविताना ब्रिट्स समवेत सलामीच्या गड्यासाठी 19.5 षटकात 102 धावांची शतकी भागिदारी केली. ब्रिट्सने 66 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 38 धावा जमविल्या. सलामीची जोडी फुटल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. डी. क्लर्कने 46 चेंडूत 2 चौकारांसह 26, डी. रिडेरने 31 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 26, शेनगेसीने 2 चौकारांसह 16 आणि लूसने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. भारतातर्फे अरुंधती रे•ाr आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर श्रेयांका पाटील आणि पूजा वस्त्रकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 46 धावा जमविल्या. वुलव्हर्ट आणि ब्रिट्स यांनी शतकी भागिदारी 115 चेंडूत नोंदविली. वुलव्हर्टने 45 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 1 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले.
भारताच्या डावाला सुरुवात होण्यापूर्वी किरकोळ पावसाच्या सरी आल्याने काही कालावधीसाठी खेळ थांबवावा लागला. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर भारताच्या डावाला प्रारंभ झाला. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी डावाला सुरुवात करत पहिल्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. शेफाली वर्माने 4 चौकारांसह 25 धावा जमविल्या. वर्मा बाद झाल्यानंतर मानधनाला पुनियाने बऱ्यापैकी साथ दिली या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भर घातली. पुनियाने 40 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा जमविल्या. मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 48 धावांची भर घातली. मानधना या मालिकेतील सलग तिसरे शतक नोंदवेल असे वाटत असताना दक्षिण आफ्रिकेच्या मलाबाने मानधनाला झेलबाद केले. तिने 83 चेंडूत 11 चौकारांसह 90 धावा जमविल्या. कर्णधार कौरने 48 चेंडूत 2 चौकारांसह 42 धावा जमविल्या. भारताला विजयासाठी केवळ एका धावेची गरज असताना कौर धावचीत झाली. रिचा घोषने विजयी षटकार ठोकून आपल्या संघाला 6 गड्यांनी विजय मिळवून दिला. रॉड्रिग्ज 1 चौकारासह 19 धावांवर तर घोष 6 धावांवर नाबाद राहिल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे मलाबा, खाका आणि सेकुखूने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताच्या डावामध्ये 2 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका 50 षटकात 8 बाद 215 (वुलव्हर्ट 61, ब्रिट्स 38, लुस 13, डी. क्लर्क 26, डी. रिडेर नाबाद 26, शेनगेसी 16, अवांतर 17, रेड्डीr 2-36, दिप्ती शर्मा 2-27, पाटील 1-35, वस्त्रकर 1-54).
भारत 40.4 षटकात 4 बाद 220 (स्मृती मानधना 90, शेफाली वर्मा 25, प्रिया पुनिया 28, हरमनप्रीत कौर 42, रॉड्रिग्ज नाबाद 19, घोष नाबाद 6, अवांतर 10, खाका, सेकुखूने, मलाबा प्रत्येकी 1 बळी).