भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष्य व्हाईटवॉशवर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत येथे रविवारी यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये तिसरा आणि शेवटचा सामना खेळविला जाणार आहे. या मालिकेत भारताने यापूर्वीच पहिले सलग दोन सामने जिंकून निर्विवाद आघाडी मिळविली आहे. आता हरमनप्रित कौरचा भारतीय संघ या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाची फलंदाजी समाधानकारक झाली असून 250 धावांचा टप्पा ओलांडला. स्मृती मानधनाची फलंदाजी पहिल्या सामन्यात चांगली झाली असून तिने शानदार शतक झळकविले. तसेच तिने दुसऱ्या सामन्यातही पुन्हा दुसरे शतक झळकविले. वनडे प्रकारात सलग दोन सामन्यात शतक झळकविणारी मानधना ही पहिली भारतीय फलंदाज आहे. तिने पहिल्या सामन्यात 117 तर दुसऱ्या सामन्यात 136 धावा जमविल्या. आता ती रविवारच्या तिसऱ्या सामन्यातही दर्जेदार फलंदाजी करेल, असा अंदाज आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 28 जूनपासून चेन्नईत एकमेव कसोटी सामना खेळविला जाणार आहे. भारतातर्फे वनडे क्रिकेटमध्ये यापूर्वी मिथाली राजने नोंदविलेला सात शतकांच्या विक्रमाशी मानधनाने बरोबरी केली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कर्णधार कौरलाही फलंदाजीचा सूर मिळाला आहे. तिने या सामन्यात 88 धावा जमविल्या होत्या. श्रेयांका पाटील, रेणुकासिंग ठाकुर, पूजा वस्त्रकर, प्रिया पुनिया तसेच इशाकी प्रमुख गोलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ रविवारच्या शेवटच्या सामन्यात भारताला व्हाईटवॉशपासून रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. रविवारचा हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होत आहे.