For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला बॅडमिंटन संघ पराभूत

06:45 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला बॅडमिंटन संघ पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)

Advertisement

येथे सुरु असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या उबेर चषक महिलांच्या सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी अ गटातील शेवटच्या सामन्यात बलाढ्या चीनने भारताचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.

भारतीय संघातील अनमोल खराब हिला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. भारतीय बॅडमिंटन संघाला या लढतीत पराभव पत्करावा लागला असला तरी भारतीय महिला संघाने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय महिला संघाने अ गटातील पहिल्या दोन लढतींमध्ये कॅनडा आणि सिंगापूर यांचा पराभव केला आहे. या स्पर्धेत पीव्ही सिंधूच्या गैरहजेरीत भारतीय महिला संघाने या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. सिंधूने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. भारत आणि चीन यांच्यातील या लढतीमध्ये दुसऱ्या एकेरी सामन्यात 17 वर्षीय अनमोल खराबच्या घोट्याचा स्नायू दुखावल्याने तिला जबरदस्त वेदना होऊ लागल्या. दरम्यान तिने हा सामना अर्धवट सोडला. चीनच्या द्वितीय मानांकित चेन फेईने पहिल्या एकेरी सामन्यात इशरानी बारुआचा 21-12, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत चीनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर महिला दुहेरीच्या सामन्यात चीनची विद्यमान विश्वविजेती जोडी चेन क्विंग चेन आणि जिया फेन यांनी भारताच्या के. प्रिया व श्रुती मिश्रा यांचा 21-13, 21-12 असा पराभव केला. या विजयामुळे चीनने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली. दुसऱ्या एकेरी सामना अनमोल खराब आणि चीनची हेन युई यांच्यात खेळविला गेला. या लढतीत हुईने पहिला गेम 21-9 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये ती 4-1 अशी आघाडीवर असताना अनमोलला ही दुखापत झाल्याने तिने माघार घेतली. हुईला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात चीनच्या लियु शेन आणि तेन निंग यांनी भारताच्या सिमरनसिंग आणि रुतिका ठाकर यांचा 21-9, 21-10 तर शेवटच्या एकेरी सामन्यात चीनच्या वेंग झी ने  भारताच्या तन्वी शर्माचा 21-7, 21-16 असा पराभव करत या लढतीत भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. अ गटातील प्राथमिक लढती आता संपुष्टात आल्या असून या गटात भारत दुसऱ्या स्थानावर असून चीन पहिल्या स्थानावर आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.