भारतीय महिला बॅडमिंटन संघाची हाँगकाँगवर मात
वृत्तसंस्था/ शाह आलम (मलेशिया)
भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगचा 3-0 असा पराभव करून बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतील पहिले पदक निश्चित केले. अव्वल मानांकित चीनला धक्का देऊन गटात अव्वल स्थान मिळविल्यानंतर भारताच्या दोन ऑलिम्पिक पदके पटकावलेली पी. व्ही. सिंधू, अश्मिता चालिहा आणि दुहेरीतील जोडी अश्विनी पोनप्पा, तनिशा क्रास्टो यांनी विजय मिळवत हाँगकाँगचा पराभव केला.
प्रदीर्घ दुखापतीतून परतलेल्या सिंधूने आपल्याहून कमी मानांकित लो सिन यान हॅप्पीविऊद्धच्या चुरशीच्या सामन्यात 21-7, 16-21, 21-12 असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला. तर तनीशा आणि पोनप्पा या जोडीने विजय मिळवून आघाडी वाढविली. जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असलेल्या युंग एनगा टिंग आणि येउंग पुई लॅम यांचा 35 मिनिटांत त्यांनी 21-10, 21-14 असा पराभव केला. त्यानंतर अश्मिताने युंग सम यीवर 21-12, 21-13 असा आरामात विजय मिळवत संघाचे किमान कांस्यपदक निश्चित केले.
महिला संघासाठी हा दिलासा देणारा निकाल आहे. मी त्यांच्या कामगिरीवर खूप खूश आहे, असे संघासोबत असलेले माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांनी शाह आलममधून सांगितले. ‘तिथे थोडासा वारा होता, त्यामुळे शटल बाहेर जात असताना त्यावर नियंत्रण ठेवणे सुऊवातीला अवघड जात होते. याचमुळे सिंधू थोडी ताणली गेली. कारण एका टोकाला त्यामुळे परिस्थिती कठीण बनली होती. पण शेवटी चांगला निकाल आलेला असून आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो आहोत’, असे ते म्हणाले. भारताचा आता अव्वल मानांकित जपान आणि चीन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातील विजेत्याशी सामना होईल.
दुसरीकडे, पुरुषांच्या संघाला मात्र महिलांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता न येऊन उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून 2-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. भारताने 2016 आणि 2020 मध्ये अशी पुऊषांच्या सांघिक स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली होती. एच. एस. प्रणॉयने सलामीच्या लढतीत जोरदार टक्कर दिली. पण 64 मिनिटांच्या लढाईनंतर जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असलेल्या निशिमोतोने 21-16, 26-24 असा विजय मिळवून पाच सामन्यांच्या लढतीत जपानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
जागतिक क्रमवारीतील अव्वल जोडी सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी केनिया मित्सुहाशी आणि हिरोकी ओकामुरा यांना 40 मिनिटांत 21-15, 21-17 असे पराभूत करून भारताला स्पर्धेत परत आणले. त्यानंतर राष्ट्रकुल विजेत्या लक्ष्य सेनने 21-19, 22-20 अशा फरकाने जागतिक क्रमवारीत 20 व्या क्रमांकावर असलेल्या कोको वातानाबेला पराभूत केले आणि भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांना अकिरा कोगा आणि काझुकी शिबाता या जोडीविरुद्ध 17-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागल्याने सामना बरोबरीत आला. 2-2 अशी बरोबरी असताना किदाम्बी श्रीकांतला दोन वेळचा माजी विश्वविजेता केंटो मोमोटा याने हरवून जपानच्या नावावर लढत केली.