For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला तिरंदाज उपांत्यपूर्व फेरीत

06:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला तिरंदाज उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी : आता फ्रान्स किंवा नेदरलँडचे आव्हान : वैयक्तिक प्रकारात मात्र महिलांचे आव्हान संपुष्टात

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रँकिंग राऊंडमध्ये महिला तिरंदाजांनी दमदार कामगिरी करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि भजन कौर यांनी भारताला 1983 अंकासह चौथे स्थान पटकावले. या स्पर्धेत एकूण 64 तिरंदाजांचा सहभाग होता. अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार होता आणि टीम इंडियाने चौथ्या स्थानी येत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केला. दरम्यान, दक्षिण कोरियाने पहिले, चीनने दुसरे तर मेक्सिकोने तिसरे स्थान पटकावले.

Advertisement

भारतीय तिरंदाजांच्या वैयक्तिक गुणांमध्ये अंकिता भगत सर्वात अचूक होती. तिने अचूक तिरंदाजी करत एकूण 666 गुण मिळवले आणि ती 11 व्या क्रमांकावर राहिली. तिच्या खालोखाल भजन कौर हिने 659 गुणांसह 22 वे स्थान पटकावले. अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही आणि ती 658 गुणांसह 23 व्या स्थानावर राहिली. यामुळे आता भारताची एकही महिला वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाही. संघामधील तीनही महिला वैयक्तिक स्पर्धेमधून बाहेर झाले आहेत. वैयक्तिक प्रकारात कोरियाच्या 21 वर्षीय लिम सिहॉनने 694 गुणासह वर्ल्ड रेकॉर्ड केले.

सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत

भारताची अव्वल तिरंदाज दीपिका, भजन आणि अंकिता या भारतीय त्रिकुटाने सांघिक प्रकारात चमकदार कामगिरी करत एकूण 1983 गुण मिळवले आणि पहिल्या चारमध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट बुक केले. अंकिता (666), भजन (659) व दीपिका (658) या तिघींचे गुण एकत्र केल्यानंतर भारतीय संघाचे 1983 गुण झाले. दरम्यान, भारताशिवाय दक्षिण कोरिया, चीन आणि मेक्सिकोचे संघही पहिल्या चारमध्ये आहेत. कोरियाच्या महिला संघाने 2046 गुण, चीनने 1996 गुण आणि मेक्सिकोच्या संघाने 1986 गुण मिळवले. भारताची आगामी लढत फ्रान्स आणि नेदरलँडस यांच्यातील विजयी संघासोबत होईल. 5 ते 12 व्या क्रमांकावर असणाऱ्या संघांना राऊंड ऑफ 16 मधून जावे लागणार आहे.

वैयक्तिक प्रकारात कोरियाच्या लिम सिहॉनचे वर्ल्ड रेकॉर्ड

गुरुवारी महिला तिरंदाजीच्या पात्रता फेरीत वैयक्तिक प्रकारात वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे पहायला मिळाले. दक्षिण कोरियाच्या 21 वर्षीय लिम सिहॉनने 720 पैकी 694 गुणांची कमाई करत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. यापूर्वी कोरियाच्या चाएंग कँगने 692 गुण मिळवत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये लिमने मात्र शानदार कामगिरी करत हा विक्रम आपल्या नावे केला. विशेष म्हणजे, 21 वेळा तिने 10 गुणाच्या लक्ष्याचा वेध घेतला. गतवर्षी झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत लिमने तब्बल सहा सुवर्णपदकांची कमाई केली होती.

टीम इंडिया उपांत्य फेरीत गेल्यास कोरियाचा करावा लागणार सामना

भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना चॅम्पियन दक्षिण कोरियाशी होऊ शकतो. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघासमोर फ्रान्स किंवा नेदरलँड्स यांचे आव्हान असणार आहे. सध्या महिला संघाची कामगिरी पाहता भारतीय संघ सहज उपांत्य फेरी गाठेल अशी आशा आहे. यामुळे खरी लढत उपांत्य फेरीत होणार आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर त्याचा सामना दक्षिण कोरियाशी होईल. दक्षिण कोरियाने ऑलिम्पिक इतिहासात तिरंदाजीमध्ये 27 सुवर्णपदके जिंकली आहेत, जी इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहेत. उपांत्य फेरीत भारतीय महिला संघासमोर तगडे आव्हान असेल, यात शंकाच नाही.

पुरुष संघही उपांत्यपूर्व फेरीमध्ये

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजापाठोपाठ पुरुष तिरंदाजांनीही सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पात्रता फेरीत भारतीय संघाने 2013 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना तुर्की आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. पुरुष तिरंदाजामध्ये धीरज बोम्मदेवरा (681), तरुणदीप राय (674) व प्रवीण जाधव (658) या तिघांचे गुण एकत्र केल्यानंतर 2013 झाले. या गुणासह भारतीय संघ तिसऱ्या स्थानी राहिला. कोरियन संघाने 2049 गुणासह अव्वलस्थान पटकावले तर फ्रान्सचा संघ 2025 गुणासह दुसऱ्या स्थानी राहिला. वैयक्तिक गटात धीरज बोम्मदेवरा वगळता इतर दोघे अपयशी ठरले. धीरज चौथ्या स्थानी राहिला तर तरुणदीप रायला 14 वे तर प्रवीण जाधवला 39 वे स्थान मिळाले.

अंकिता-धीरज मिश्रमध्ये विजयी

दरम्यान, मिश्र सांघिक गटातही धीरज बोम्मदेवरा (681) व अंकिता भगत (666) जोडीने 1347 गुणाची कमाई करताना पाचवे स्थान पटकावले. या विजयासह भारतीय जोडीने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता, पुढील फेरीत भारतीय जोडीचा सामना इंडोनेशियाशी होईल. कोरियाचा संघ 1380 गुणासह पहिल्या स्थानी राहिला.

Advertisement
Tags :

.