भारतीय महिलांचा चीनला धक्का,
बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप : 3-2 फरकाने मात
वृत्तसंस्था/ शाह आलम, मलेशिया
येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमधील पहिल्याच लढतीत भारताच्या महिला संघाने बलाढ्या चीनला 3-2 असा पराभवाचा धक्का दिला. चार महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या पीव्ही सिंधूने विजयी सुरुवात केली.
गट डब्ल्यूमध्ये केवळ दोनच संघ असल्याने भारताचे बाद फेरीतील स्थान स्पर्धा सुरू होण्याआधीच निश्चित झाले होते. पण पहिल्याच लढतीत त्याने धक्कादायक निकाल नोंदवत अग्रमानांकित चीन संघाला पराभूत केले. गेल्या ऑक्टोबरपासून दुखापतीमुळे दूर राहिलेल्या पीव्ही सिंधूने आघाडीवर राहत तिच्यापेक्षा वरचे मानांकन असणाऱ्या चीनच्या हान युईचा 21-17, 21-15 असा पराभव केला. 40 मिनिटांत हा सामना जिंकून तिने भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दोन ऑलिम्पिक पदके मिळविणारी 28 वर्षीय सिंधू जागतिक क्रमवारीत सध्या 11 व्या तर युई जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे.
तनिशा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांना दुहेरीच्या लढतीत लियू शेंग शू व टॅन निंग यांच्याकडून 19-21, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला तर अश्मिता चलिहाला जागतिक नवव्या मानांकित वांग झि यी हिच्याकडून 13-21, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने भारत 1-2 असे पिछाडीवर पडले. त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांची चीनच्या लि यि जिंग व लुओ झु मिन यांच्यावर 10-21, 21-18, 21-17 अशी मात करून भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. एक तास 9 मिनिटे ही लढत रंगली होती.
निर्णायक पाचव्या सामन्यात अनमोल खर्बने जागतिक क्रमवारीत 149 व्या क्रमांकावर असणाऱ्या वु लुओ यू हिचा 22-20, 14-21, 21-18 असा धक्कादायक पराभव करून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. अनमोल जागतिक क्रमवारीत 472 व्या स्थानावर आहे. 2022 मध्ये थॉमस चषक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष संघाने मागील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले रौप्यपदक मिळविले होते. येथे त्यांची सलामीची लढत हाँगकाँगविरुद्ध होणार आहे.