भारतीय महिला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजयासाठी सज्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विक्रमी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ आज शनिवारी येथे होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा सामना करेल तेव्हा त्यांच्याविरुद्धची एकदिवसीय मालिका पहिल्यांदाच जिंकून इतिहास घडविण्यावर लक्ष केंद्रीत करेल.
यजमान संघाला कधीही द्विपक्षीय मालिकेत या विश्वविजेत्या संघावर विजय मिळवता आलेला नाही आणि आजचा विजय केवळ मालिका नावावर जमा करून जाणार नाही, तर 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने आत्मविश्वास आणि गती देऊन जाईल. तथापि, हे सोपे नाही. पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर, हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने 102 धावांनी शानदार विजय मिळवला. हा धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा सर्वांत मोठा पराभव होता.
12 सामन्यांमधील भारताचा त्यांच्यावरचा तो पहिलाच विजय होता. तरीही, काही त्रुटी अजूनही जाणवत आहेत. दुसऱ्या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण खराब होऊन त्यांनी सहा झेल सोडले, ज्यामुळे दोन सामन्यांमध्ये त्यांनी गमावलेल्या संधींची संख्या 10 झाली. काही वेळा मैदानात चमकदार कामगिरी झाली, परंतु सातत्याचा अभाव चिंताजनक राहिला. विशेषत: काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये याच गटाने केलेल्या धारदार क्षेत्ररक्षणाच्या तुलनेत ही त्रुटी जास्तच जाणवणारी होती.
तरीही सतत संधी निर्माण करण्याचे श्रेय गोलंदाजांना दिले पाहिजे. स्ट्रेस फ्रॅक्चरमधून ठीक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेली वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर आणि तिची वेगवान जोडीदार क्रांती गौड यांनी ऑस्ट्रेलियाच्या वरच्या फळीला धक्का दिला, तर फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये दबाव कायम ठेवला. मध्यमगती गोलंदाजीचा तिसरा पर्याय म्हणून अऊंधती रे•ाrचा केलेला समावेश देखील भारतासाठी चांगला ठरला. तथापि, यजमान संघ पुन्हा एकदा वेगळ्या रचनेसह खेळण्याची अपेक्षा आहे. ‘या मालिकेत आम्हाला प्रत्येकाला संधी द्यायची आहे. काही रचना आजमावून पाहण्याचा विचार आहे’, असे कर्णधाराने सांगितले.
फलंदाजीमध्ये सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतीका रावल यांनी दोन्ही सामन्यांमध्ये वेगवान सुऊवात करून दिली, परंतु मधल्या फळीला भागीदारी करण्यात संघर्ष करावा लागला. या मालिकेत भारताच्या धावांत मोठा वाटा मानधनाने उचलला आहे. शफाली वर्मा आता नसल्याने उपकर्णधाराने आक्रमक भूमिका घेतली आहे. तिने दुसऱ्या सामन्यात तिचे 12 वे एकदिवसीय शतक झळकावले, भारताच्या एकूण 292 धावांमध्ये 40 पेक्षा जास्त अशी ही एकमेव धावसंख्या होती. त्यामुळे आता हरमनप्रीत, हरलीन देओल आणि रिचा घोषसारख्या खेळाडूंनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. विशेषत: जेमिमा रॉड्रिग्ज विषाणू संसर्गामुळे बाहेर पडल्यामुळे हे आवश्यक बनले आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 1:30 वा.