भारतीय महिलांची सलामी मलेशियाशी
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : 11 नोव्हेंबरपासून होणार स्पर्धेला प्रारंभ
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
बिहारमध्ये 11 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत दोन वेळच्या विजेत्या भारताची सलामीची लढत यजमान मलेशियाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होत असून यजमान व विद्यमान विजेते भारत, चीन, तीनवेळचे विजेते कोरिया, दोनवेळचे विजेते जपान, मलेशिया, थायलंड यांचा त्यात समावेश आहे. आशियाई हॉकी फेडरेशनने मंगळवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. बिहारमधील राजगिर येथे खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारताने 2016 साली सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर गेल्या वर्षी रांचीमध्ये झालेली स्पर्धाही जिंकली होती.
मलेशियाविरुद्धच्या पहिल्या लढतीनंतर भारतीय महिलांचा दुसरा सामना कोरियाविरुद्ध 12 नोव्हेंबर रोजी, थायलंडविरुद्ध 14 नोव्हेंबर रोजी, चीनविरुद्ध 16 नोव्हेंबर रोजी व जपानविरुद्ध 17 नोव्हेंबर रोजी भारताचे पुढील सामने होणार आहेत. राऊंडरॉबिन फेरीनंतर पहिले चार क्रमांक मिळविणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 19 नोव्हेंबर रोजी या लढती होतील तर जेतेपदाची लढत 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. बिहार राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असेल. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी नव्याने बांधलेले राजगिर हॉकी स्टेडियम परिपूर्ण व्यासपीठ असेल. भारत या स्पर्धेचे जेतेपद स्वत:कडेच अशी आम्हाला आशा वाटत असून आशियातील सर्वोत्तम संघांचा खेळ त्यात पहावयास मिळणार आहे, अशा भावना हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी व्यक्त केल्या. खेळाडू व चाहत्यांना या स्पर्धेद्वारे सर्वोत्तम अनुभव मिळेल, अशी आशा आशियाई हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष डाटो फुमिओ ओगुरा यांनी व्यक्त केली.