भारतीय महिलांनी रचला इतिहास
टी-20 आणि वनडे मालिकेत यश : तिसऱ्या वनडेसह मालिका 2-1 फरकाने जिंकली : सामनावीर हरमनप्रीत कौरचे शतक
वृत्तसंस्था/ चेस्टर ली स्ट्रीट
तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडचा 13 धावांनी पराभव करून मालिका 2-1 अशी जिंकली. हरमनप्रीत कौरची 84 चेंडूत 102 धावांची शानदार खेळी आणि क्रांती गौडची 6/52 ची स्फोटक गोलंदाजी या जोरावर भारताने हा सामना सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गडी गमावून 318 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 305 धावांत ऑलआऊट झाला. या विजयासह भारतीय महिलांनी प्रथमच टी 20 मालिकेपाठोपाठ वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. प्रतिका रावल 26 धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना व हरलीन देओल यांनी डाव सावरला. पण, 18 व्या षटकात स्मृती बाद झाली. तिने 54 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. हरलीन व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटससाठी 81 धावा जोडल्या. हरलीनने 45 धावांचे योगदान दिले. यानंतर हरमनप्रीतने जेमिमा रॉड्रिग्जसोबत शतकी भागीदारी साकारताना संघाला भक्कम स्थितीत नेले. यादरम्यान, हरमनप्रीतने वनडेतील सातवे शतक झळकावताना 84 चेंडूत 14 चौकारासह 102 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तिला जेमिमाने 7 चौकारासह 50 धावा करत मोलाची साथ दिली. जेमिमा बाद झाल्यानंतर रिचा घोषने नाबाद 38 धावा फटकावल्या. तर हरमनप्रीत शतकानंतर बाद झाली. हरमनप्रीतच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकांत 5 गडी गमावत 318 धावा केल्या.
क्रांतीचे 6 बळी, इंग्लंड 305 धावांत ऑलआऊट
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे दोन्ही ओपनर एमी जोन्स व टॅमी ब्युमँट यांना क्रांती गौडने बाद केले. एमा लॅम्ब व कर्णधार नॅट स्केव्हियर ब्रंट यांनी संघाचा डाव सावरला. लॅम्बने 68 धावांची खेळी केली. सोफी डंक्ली (34) व एलिस डेव्हिडसन रिचर्ड्स (44) यांनी इंग्लंडच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. दुस्रया बाजूने ब्रंट शतकाजवळ पोहोचली होती. पण, 35 व्या षटकात ब्रंटला माघारी जावे लागले. तिने 105 चेंडूंत 11 चौकारांसह 98 धावांची खेळी केली. चार्ली डीन (21) व लिन्सी स्मिथ (14) यांचा संघर्ष अयशस्वी ठरला आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ 49.5 षटकांत 305 धावांत तंबूत परतला. क्रांती गौडने 52 धावांत 6 विकेट्स घेतल्या. श्री चरणीने दोन, तर दीप्ती शर्माने 1 बळी टिपला.
भारताचा हा इंग्लंडमध्ये तिसरा वनडे मालिका विजय ठरला. यापूर्वी 1999 मध्ये 2-1 आणि 2022 मध्ये 3-0 अशी वनडे मालिका भारताने जिंकली होती.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ 50 षटकांत 5 बाद 318 (प्रतिका रावल 26, स्मृती मानधना 45, हरलीन देओल 45, हरमनप्रीत कौर 102, जेमिमा रॉड्रिग्ज 50, लॉरेन बेल, लॉरेन फिलर, लिन्से स्मिथ, डीन, एक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी)
इंग्लंड महिला संघ 49.5 षटकांत सर्वबाद 305 (एम्मा लँब 68, ब्रंट 98, रिचर्ड्स 44, क्रांती गौड 52 धावांत 6 बळी).