स्कॉटलंडला हरवून भारतीय महिला उपांत्य फेरीत
सामनावीर त्रिशा गोंगाडीचे पहिले शतक, गोलंदाजीत 3 बळी, आयुषीचे 4 बळी
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
सलामीची फलंदाज आणि ‘सामनावीर’ त्रिशा गोंगाडीच्या शानदार पहिल्या शतकाच्या जोरावर येथे सुरु असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारच्या सामन्यात भारतीय युवा महिला संघाने स्कॉटलंडचा 150 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेतील त्रिशा गोंगाडीचे हे पहिले शतक आहे. या स्पर्धेत आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना 31 जानेवारीला खेळविला जाईल.
या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 1 बाद 208 धावा जमविल्या. त्यानंतर भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा डाव 14 षटकात केवळ 58 धावांत आटोपला.
भारताच्या डावामध्ये गोंगाडी त्रिशा आणि कमलिनी या सलामीच्या जोडीने 81 चेंडूत 147 धावांची शतकी भागिदारी केली. या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजीला प्रारंभ केला आणि त्यांनी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. कमलिनीने 42 चेंडूत 9 चौकारांसह 51 धावा जमविल्या. गोंगाडी त्रिशाने 59 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 110 धावा झळकाविताना सानिका चाळकेसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 39 चेंडूत अभेद्य 61 धावांची भागिदारी केली. चाळकेने 20 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 29 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 4 षटकार आणि 27 चौकार नोंदविले गेले. स्कॉटलंडतर्फे मेसिराने 25 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना स्कॉटलंडच्या डावामध्ये सलामीच्या केलीने 8 चेंडूत 3 चौकारांसह 12, वेलसिंगहॅमने 15 चेंडूत 2 चौकारांसह 12 आणि स्प्रोलने 16 चेंडूत 1 चौकारासह 11 आणि नईमा शेखने 18 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 10 धावा केल्या. स्कॉटलंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारतातर्फे डावखुरी फिरकी गोलंदाज आयुषी शुक्ला सर्वात प्रभावी ठरली. तिने 8 धावांत 4 गडी बाद केले. तर डावखुरी मध्यमगती गोलंदाज वैष्णवी शर्माने 5 धावांत 3 तसेच त्रिशा गोंगाडीने 6 धावांत 3 गडी बाद केले. स्कॉटलंडच्या डावात 7 चौकार नोंदविले गेले.
बांगलादेशची विंडीजवर मात
या स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या अन्य एका सामन्यात बांगलादेशने विंडीजचा 10 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजने 13 षटकात 6 बाद 54 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशने विंडीजचे हे उद्दिष्ट केवळ 9 षटकात पार करताना एकही गडी गमाविला नाही. सलामीच्या जुरिया फिरदोशने नाबाद 25 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये बांगलादेशच्या निशिता अख्तर निशीने 3 गडी बाद केले. तर अनिसा सोबाने 2 बळी मिळविले. या विजयामुळे गट 1 मध्ये बांगलादेश संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पावसामुळे या सामन्यात अडथळा आल्याने पंचांनी 13 षटकांचा खेळ करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, गट 2 मधील दक्षिण आफ्रिका व अमेरिका यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेची यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे. तर गट 2 मध्ये अमेरिकेने तिसरे स्थान मिळविले.
संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकात 1 बाद 208 (जी. कमलिनी 51, त्रिशा गोंगाडी नाबाद 110, सानिका चाळके नाबाद 29, अवांतर 18, मेसिरा 1-25), स्कॉटलंड 14 षटकात सर्वबाद 58 (केली 12, वेलसिंगहॅम 12, स्प्रोल 11, शेख नाबाद 10, आयुषी शुक्ला 4-8, वैष्णवी शर्मा 3-5, त्रिशा गोंगाडी 3-6).