For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला थाटात फायनलमध्ये

06:10 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला थाटात फायनलमध्ये
Advertisement

महिला वर्ल्डकपच्या उपांत्य लढतीत बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा : शतकवीर जेमिमा ठरली सामन्याची हिरो : हरमनप्रीतचीही दमदार खेळी : फायनलमध्ये आफ्रिकेचे आव्हान

Advertisement

वृत्तसंस्था/नवी मुंबई

सामनावीर जेमिमा रॉड्रिग्जचे नाबाद शतक आणि हरमनप्रीत कौरच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलियन संघाचा 5 विकेट्सनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या ऐतिहासिक विजयासह टीम इंडिया 8 वर्षांनी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. आता विजेतेपदासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.

Advertisement

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 338 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य भारतीय संघाने 48.3 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत थाटात फायनल गाठली आहे. जेमिमा रॉड्रिग्जने 134 चेंडूत नाबाद 127 धावांची खेळी साकारत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तिलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

जेमिमाचा शतकी धमाका, हरमनचीही मोलाची साथ

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 339 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शेफाली वर्माला केवळ 10 धावा करता आल्या. स्टार फलंदाज स्मृती मानधनाही स्वस्तात बाद झाली. तिला 24 धावांवर किम गर्थने माघारी धाडले. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्री कौरने तिसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी रचत टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. हरमनने शानदार खेळी साकारताना 88 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारासह 89 धावांची खेळी साकारली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना तिला सदरलँडने बाद केले. यानंतर जेमिमाने मात्र संयमी आणि शानदार नाबाद शतकी खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. जेमिमाने 134 चेंडूत 14 चौकारासह नाबाद 127 धावा केल्या. जेमिमाला दीप्ती शर्मा (24), रिचा घोष (26), अमनजोत कौर (नाबाद 15) यांनी चांगली साथ दिली. टीम इंडियाने विजयी लक्ष्य 48.3 षटकांतच पार करत विजयाला गवसणी घातली.

कांगारुंना पराभवाचा धक्का

प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् भारतीय संघाने सहाव्या षटकात त्यांना धक्का दिला. क्रांती गौडने कर्णधार एलिसा हिलीला माघारी पाठवले. तिला केवळ 5 धावा करता आल्या. यानंतर सामन्यावर पकड घेण्याची भारताला संधी होती. पण, लिचफिल्ड आणि पेरी यांनी ऑस्ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. या जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. लिचफिल्डने 77 चेंडूंत शतक पूर्ण करून वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील वेगवान शतकाचा व युवा शतकवीर असे दोन्ही विक्रम नावावर केले. तिने 93 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकारासह 119 धावांची शानदार खेळी साकारली. तिला एलिस पेरीने 77 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दरम्यान, 28 व्या षटकात अमनज्योतने लिचफिल्डला बाद करत टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. .

एलिस पेरी, गार्डनरची अर्धशतके

यानंतर फलंदाजीला आलेल्या बेथ मूनीने (24) तिसऱ्या विकेटसाठी पेरीसह 40 धावा जोडल्या. मैदानात सेट होत चाललेल्या या जोडीला श्री चरणीने धक्का दिला. बेथ मूनी व अॅनाबेल सदरलँड (3) यांना सलग दोन षटकांत माघारी पाठवून तिने मोठे यश मिळवून दिले. यानंतर 40 व्या षटकात भारताला मोठी विकेट मिळाली. राधा यादवने टाकलेल्या चेंडूवर कट शॉट मारण्याच्या प्रयत्नात पेरी त्रिफळाचीत झाली. तिने 88 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 77 धावांचे योगदान दिले. पेरी बाद झाल्यानंतर अनुभवी अॅश्ले गार्डनरने धमाकेदार खेळी साकारत संघाला तीनशेपार नेले. तिने अवघ्या 45 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारासह 63 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. गार्डनर 49 व्या षटकात रनआऊट झाली. यानंतर दीप्तीने शेवटच्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 338 धावांत ऑलआऊट झाला.

टीम इंडिया 8 वर्षानंतर फायनलमध्ये

भारतीय संघाने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयासह टीम इंडिया 8 वर्षांनी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच नवा विजेता मिळणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी या स्पर्धेत विजय मिळवला आहे. आता पहिल्यांदाच वर्ल्डकप न जिंकणारे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. हा सामना 2 नोव्हेंबरला होईल. या सामन्यात क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळणार हे  नक्की झालं आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलियन महिला संघ : 49.5 षटकांत सर्वबाद 338 (लिचफिल्ड 119, एलिस पेरी 77, अॅश्ले गार्डनर 63, किम गर्थ 17, श्री चरणी आणि दीप्ती शर्मा प्रत्येकी 2 बळी, क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव प्रत्येकी 1 बळी) भारतीय महिला संघ : 48.3 षटकांत 5 बाद 341 (शेफाली वर्मा 10, स्मृती मानधना 24, जेमिमा रॉड्रिग्ज 134 चेंडूत 14 चौकारासह नाबाद 127, हरमनप्रीत कौर 89, दीप्ती शर्मा 24, रिचा घोष 26, अमनजोत कौर नाबाद 15, किम गर्थ आणि सदरलँड प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.