भारतीय महिलांनी उडवला यूएईचा धुव्वा
आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात 78 धावांनी विजय : रिचा घोषची तुफानी फटकेबाजी, हरमनप्रीतचेही अर्धशतक
वृत्तसंस्था/ डम्बुला, श्रीलंका
टीम इंडियाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात यूएईविरुद्ध 78 धावांनी विजय मिळवला. हरमनप्रीत आणि रिचा घोष या दोघींच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेतील सर्वोच्च धावा केल्या. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 बाद 201 धावा केल्या. यामुळे यूएईला 202 धावांचे आव्हान मिळाले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना युएई संघाला 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 123 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय महिलांचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे. 29 चेंडूत 64 धावांची वादळी खेळी करणाऱ्या रिचा घोषला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय संघाचा पुढील सामना दि. 23 रोजी नेपाळविरुद्ध होईल.
प्रारंभी, युएईने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. डावखुरी फलंदाज स्मृती मानधना 13 धावा काढून बाद झाली. शेफाली वर्माने 18 चेंडूत 37 धावा केल्या पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तिनेही विकेट फेकली. यानंतर हेमलताही (2) धावा काढून तंबूत परतली. जेमिमा रॉड्रिग्जनेही निराशा केली. तिला केवळ 14 धावा करता आल्या. यावेळी भारतीय संघाची 4 बाद 106 अशी स्थिती होती.
रिचाची फटकेबाजी, हरमनप्रीतचेही अर्धशतक
भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार हरमनप्रीत कौर व यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने युएईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना पाचव्या गड्यासाठी 75 धावांची भागीदारी साकारली. हरमनप्रीतने 47 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 66 धावांची दमदार खेळी साकारली. पण अखेर धवचीत होऊन तिला तंबूत परतावे लागले. हरमनप्रीत बाद झाली असली तरी रिचा घोषने मात्र यावेळी संघाचा 200 धावांचा टप्पा ओलांडू देण्यात महत्चा वाटा ओलांडला. रिचाने तुफानी खेळी साकारताना अवघ्या 29 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. यामध्ये तब्बल 12 चौकारांचा समावेश होता, तर एक षटकारही तिने खेचला. रिचाच्या या फटकेबाजीमुळे भारताला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 201 धावा करता आल्या. युएईकडून कविशा इगोडगेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या तर हीना होतचंदानी आणि समायरा धरणीधरका यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
युएईवर 78 धावांनी विजय
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युएईला संघाला 7 बाद 123 धावापर्यंतच मजल मारता आली. भारतीय महिला संघाने हा सामना तब्बल 78 धावांनी जिंकला. रेणुका सिंग, पूजा वस्त्राकार व दीप्ती शर्मा यांच्या भेदक माऱ्यासमोर युएई संघाची सुरुवात चांगली झाली नाही. एकवेळ त्यांनी 36 धावांत 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण, कर्णधार इशा ओझा व कविशा इगोडगे यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने 40 धावांची भागीदारी केली. इशा ओझाने 36 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले पण तिला तनुजा कंवरने बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. कविशाने 32 चेंडूत सर्वाधिक 40 धावा फटकावल्या. इशा बाद झाल्यानंतर कविशाला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. खुशी शर्माने 10 धावा केल्या. युएई संघाला या सामन्यात 78 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून दीप्ती शर्माने 2 तर रेणुका सिंग, राधा यादव, पूजा वस्त्राकार यांनी प्रत्येकी एक गडी बाद पेले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ 20 षटकांत 5 बाद 201 (शेफाली वर्मा 37, स्मृती मानधना 13, हरमनप्रीत कौर 66, जेमिमा 14, रिचा घोष 29 चेंडूत नाबाद 64, कविशा दोन बळी).
युएई 20 षटकांत 7 बाद 123 (इशा ओझा 38, कविशा 40, खुशी शर्मा 10, दीप्ती शर्मा 2 बळी, रेणुका, तनुजा, पूजा व राधा प्रत्येकी एक बळी).
टी 20 क्रिकेटच्या इतिहासात भारत प्रथम दोनशेपार
भारतीय महिला संघाला आतापर्यंत टी 20 सामन्यांत 200 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. पण या सामन्यात प्रथमच त्यांनी 200 धावांचा टप्पा ओलांडत इतिहास रचला आहे. आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारताने युएईविरुद्ध 5 बाद 201 धावा केल्या. याआधी भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या 4 बाद 198 अशी होती. या धावा 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध केल्या होत्या.
टी 20 क्रिकेटमध्ये भारतीय महिलांची सर्वोच्च धावसंख्या
यूएई विरुद्ध - 201 धावा (2024)
इंग्लंडविरुद्ध - 198 धावा (2018)
न्यूझीलंडविरुद्ध - 194 धावा (2018)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध - 187 धावा (2022).