नेपाळविरुद्ध आज विजयी घोडदौड कायम राखण्यास भारतीय महिला सज्ज
वृत्तसंस्था/ डंबुला
दमदार भारत आज मंगळवारी येथे महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेतील ‘अ’ गटातील त्यांच्या अंतिम सामन्यात नेपाळचा सामना करताना त्यांची विजयी घोडदौड वाढविण्याचा आणि उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. भारताने या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगले विजय नोंदवलेले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांना अनुक्रमे सात गडी राखून आणि 78 धावांनी पराभूत केल्याने उपांत्य फेरीत त्यांनी एक पाऊल ठेवल्यात जमा आहे.
या स्पर्धेतील जेतेपदाचा जबरदस्त दावेदार असलेल्या गतविजेत्या भारताने असाहाय्य वाटणाऱ्या अमिराती संघाला पुरते नेस्तनाबूत केले. त्याच दिवशी रविवारी त्यांच्या मागील सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवातून सावरण्यास नेपाळला फारसा वेळ मिळालेला नाही. भारत अंतिम चार संघांमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असताना पाकिस्तानने नेपाळवर आरामात विजय मिळवून त्यांची निव्वळ धावगती सुधारली आणि या निकालाने त्यांना ‘अ’ गटात दुसरे स्थान मिळवून दिले आहे.
तथापि, इतर संघांच्या कामगिरीची भारताला पर्वा राहणार नाही आणि उपांत्य फेरीत प्रवेश करताना दोन खात्रीशीर विजय मिळवून प्राप्त केलेली गती कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगले प्रदर्शन घडविलेले आहे आणि मंगळवारीही ते त्याच पद्धतीने आपला धडाका सुरू ठेवण्याची शक्यता आहे. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या धडाकेबाज सलामीच्या जोडीने पाकिस्तानविऊद्धच्या विजयात जोरदार फटकेबाजी केली, तर अमिरातीविरुद्ध गोलंदाजांच्या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी मधल्या फळीत तडाखेबंद फलंदाजीचे नेतृत्व केले.
विशेषत: घोष अमिरातीविरुद्ध विनाशकारी मूडमध्ये होती. कारण तिने फक्त 29 चेंडूंत 64 धावा केल्या, तर कौरने 47 चेंडूत 66 धावा केल्या. कौरने डावाची उभारणी करण्याची भूमिका पूर्णत्वास नेली, तर घोषच्या धमाकेदार खेळीमुळे भारताला टी-20 मध्ये पहिल्यावहिल्या 200 पेक्षा जास्त धावसंख्येची नोंद करण्यात मदत झाली. भारतीय गोलंदाजीचा विचार करता रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार आणि दीप्ती शर्मा यांनी धावा रोखणे आणि बळी घेणे या दोन्ही बाबतीत अप्रतिम कामगिरी केली आहे.
दुखापतग्रस्त ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलच्या जागी खेळवण्यात आलेल्या तनुजा कंवरनेही आपले काम चोख बजावताना चार षटकांच्या पूर्ण कोट्यात बळी घेताना केवळ 14 धावा दिल्या. इंदू बर्माच्या नेतृत्वाखालील नेपाळने संयुक्त अरब अमिरातीवर सहा गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून स्पर्धेची सुऊवात केली होती. या स्पर्धेतील त्या पहिल्यावहिल्या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत झालेली असेल. परंतु प्रबळ भारताला आव्हान देणे सोडाच, त्याच्या जवळपासही येण्यासाठी त्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागतील.
संघ : भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा, अऊंधती रेड्डी रेणुका सिंग, डी. हेमलता, आशा शोभना, राधा यादव, तनुजा कंवर, सजना सजीवन.
नेपाळ : इंदू बर्मा (कर्णधार), काजोल श्रेष्ठ, ऊबिना छेत्री, शबनम राय, सीता राणा मगर, राजमती आयरी, पूजा महतो, बिंदू रावल, रोमा थापा, ममता चौधरी, कविता जोशी, कविता कुंवर, डॉली भट्ट, कृतिका मरासिनी, समझाना खडका.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.