भारतीय टेटे संघाची विजय सलामी
वृत्तसंस्था/ बुसान (कोरिया)
विश्व सांघिक टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरूष संघाने विजयी सलामी देताना चिलीचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. आता या स्पर्धेत भारतीय पुरूष संघाचा पुढील सामना पोलंड बरोबर रविवारी तर त्यानंतर सोमवारी दक्षिण कोरिया बरोबर आणि मंगळवारी न्यूझीलंड बरोबर होणार आहे.
भारत आणि चिली यांच्यातील या सलामीच्या लढतीत एकेरी सामन्यात भारताच्या शरथ कमलने चिलीच्या बर्गोसचा 11-5, 11-8, 11-6 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताचा टॉप सिडेड आणि विद्यमान राष्ट्रीय विजेता हरमित देसाईने चिलीच्या गोमेझचा 11-8, 11-7, 11-6 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या एकेरी सामन्यात भारताच्या जी. साथियानने चिलीच्या फिलीपीवर 12-10, 11-8, 11-8 अशी मात केली. या विजयामुळे भारतीय पुरूष संघ या स्पर्धेत गट तीनमधून गुणतक्त्यात दोन गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. या गटात दक्षिण कोरिया चार गुणासह पहिल्या तर चिली तीन गुणास दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण कोरिया आणि चिली यांचे या गटात प्रत्येकी दोन लढती झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये रविवारी भारतीय महिला संघाची सलामीची लढत हंगेरी बरोबर होणार आहे.