भारतीय कसोटी संघाची घोषणा
शुभमन गिलकडेच नेतृत्व, जडेजा उपकर्णधार : करुण नायरला मात्र डच्चू : देवदत्त पडिक्कलचे पुनरागमन
वृत्तसंस्था/मुंबई
वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघाची निवड गुरुवारी करण्यात आली. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. मालिकेतील पहिली कसोटी 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये तर दुसरी कसोटी 10 ऑक्टोबरपासून दिल्लीमध्ये खेळवली जाईल. आशिया चषक स्पर्धेत खेळणारे खेळाडू या मालिकेत खेळणार की नाही, याची उत्सुकता होती. पण, निवड समितीने आगामी महत्त्वाच्या कसोटी मालिका लक्षात घेता प्रमुख खेळाडूंची निवड केली आहे. 28 सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेची फायनल होतेय आणि 2 ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.
जडेजा उपकर्णधार, नायरला डच्चू
गिलच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर होणारी ही पहिलीच कसोटी मालिका आहे. दुसरीकडे, अनुभवी जडेजाकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. देवदत्त पडिक्कलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र करुण नायर आणि आकाशदीप यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेत करुण नायर अपयशी ठरला होता. त्याने चार कसोट्यांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावले होते. सात वर्षानंतर संघात संधी मिळालेल्या करुणला आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे त्याला मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे.
ऋषभ पंत जखमी, एन. जगदीशन नवा चेहरा
यष्टीरक्षक ऋषभ पंत अजूनही पूर्णपणे फिट नसल्याने त्यांच्या जागी नारायण जगदीशनला संधी देण्यात आली आहे. पायाला फ्रॅक्चर झालेला यष्टीरक्षक ऋषभ पंत वेस्ट इंडिज मालिकेतून बाहेर पडला आहे, त्याच्या जागी ध्रुव जुरेल पहिल्या पसंतीचा बदली खेळाडू म्हणून खेळेल. तर तामिळनाडूचा एन. जगदीशन बॅकअप यष्टीरक्षक असेल.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. फिरकी गोलंदाज म्हणून संघात रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू आहेत. तसेच अक्षर पटेलनेही कसोटी संघात पुनरागमन केले आहे. यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, बी साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल हे मधल्या फळीत दिसणार आहेत. नितीश कुमार रे•ाrही संघात स्थान मिळवण्यास यशस्वी ठरला.
विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुमार रे•ाr, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह.
7 वर्षानंतर विंडीज संघ भारतात कसोटी मालिका खेळणार
सात वर्षांनी वेस्ट इंडिजचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. 2018 मध्ये त्यांनी मागील मालिका 2-0 ने गमावली होती. ही मालिका सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद चक्रातील भारताची पहिली घरची मालिका आहे, तर ही वेस्ट इंडिजची पहिली परदेशातील मालिका आहे. उभय संघातील मालिका चुरशीने खेळली जाणार हे निश्चित.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी - 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद -सकाळी 9:30 वा.पासून
- दुसरी कसोटी - 10 ते 14 ऑक्टोबर, नवी दिल्ली -सकाळी 9:30 वा.पासून