उत्तरेकडे सरकतेय भारतीय टेक्टोनिक प्लेट
पृथ्वीचा पृष्ठभाग नेहमीच हलत राहतो, परंतु आता वैज्ञानिकांनी एक चकित करणारा शोध लावला आहे. भारताची मुख्य टेक्टॉनिक प्लेट (इंडियन प्लेट) तिबेटखाली दोन हिस्स्यांमध्ये तुटतेय, यामुळे भूकंप, ज्वालामुखी विस्फोट आणि मोठे भूगर्भीय बदल घडू शकतात. अमेरिकेच्या कोलोराडो विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. जर हे जलद घडले तर हिमालय क्षेत्रातील लाखो लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
प्लेट तुटण्याची कहाणी
पृथ्वीचा वरील पृष्ठभाग अनेक प्लेट्समध्ये (टेक्टॉनिक प्लेट्स) विभागलेला आहे, जो हळूहळू हलत असतो. भारताची प्लेट आफ्रिकेपासून वेगळी होत उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. आता नव्या संशोधनात ही प्लेट तिबेटखाली 100 किलोमीटर खोलवर दोन हिस्स्यांमध्ये विभागली जात असल्याचे आढळून आले. वरील हिस्सा हिमालयाच्या दिशेने ढकलत आहे, तर खालील हिस्सा मंगोलियाच्या दिशेने सरकत आहे. नेचर नियतकालिकात प्रकाशित या अध्ययनानुसार ही प्रक्रिया 50 लाख वर्षांपूर्वी सुरू झाली होती, परंतु आता वेगवान झाली आहे. वैज्ञानिकांनी सिस्मिक वेव्सचे (भूकंपीय तरंग) अध्ययन केले, यात प्लेटदरम्यान एक रिफ्ट तयार होत असल्याचे दिसून आले. हे रिफ्ट 200-300 किलोमीटर लांब आहे. जर हे वाढले तर तिबेटचे पठार आणि हिमालयीन शिखरं बदलू शकतात.
वैज्ञानिकांचा इशारा
ही प्लेट तुटणे हिमालयाच्या निर्मितीचा नवा टप्पा असू शकतो, परंतु यामुळे मोठे भूकंप होऊ शकतात, जे 8 किंवा 9 तीव्रतेचे असतील, असे अध्ययनाचे प्रमुख वैज्ञानिक ब्रैडेन चाउ यांनी सांगितले आहे. कोलोराडो विद्यापीठाच्या टीमने 20 वर्षांच्या डाटाचे विश्लेषण केले. तिबेटखालील प्लेटचा खालचा हिस्सा वितळत आहे, यामुळे मॅग्मा वर येऊ शकतो, जो ज्वालामुखी निर्माण करेल असे चाउ यांनी म्हटले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे डॉ. आर.के. सिंह यांनी ही स्थिती भारतासाठी धोक्याची असे म्हणत हिमालय पूर्वीच भूकंप संवेदनशील असून 2005 चा काश्मीर भूकंप याच प्लेटमुळे झाला होता, अशी माहिती दिली. रिफ्ट जर वाढली, तर दिल्ली, मुंबईसारख्या शहरांपर्यंत धक्के जाणवतील. अध्ययनानुसार हा बदल 10-20 लाख वर्षांमध्ये होईल, परंतु छोटे छोटे भूकंप आताच वाढू शकतात.

टेक्टॉनिक्स प्लेट
टेक्टॉनिक प्लेट्स पृथ्वीच्या बाहेरील आवरणाचे (क्रस्ट) तुकडे आहेत, जे मॅग्मावर तरंगतात. भारताची प्लेट दरवर्षी 5 सेंटीमीटरने उत्तरेकडे सरकते. तिबेटखाली हे सबडक्शन (खचणे) ऐवजी रिफ्टिंग (तुटणे) करत आहे.
कसे कळले? : भूकंपाचे तरंग प्लेटच्या आतून जाताना बदलतात. वैज्ञानिकांनी जीपीएस डाटा आणि सॅटेलाइट इमेजद्वारे तिबेट उंच होत असल्याचे दिसले.
का घडतेय : प्लेटचा दबाव अधिक झाला, वरील हिस्सा हिमालयाला उंच करत आहे (दरवर्षी 5 मिमी), परंतु खालील हिस्सा सरकत नाही.
काय घडणार : रिफ्टमुळे नव्या प्लेट्स निर्माण होतील, ज्या हिमालयाला आणखी उंच किंवा चपटे करू शकतील, ही प्रक्रिया मंद आहे, परंतु प्रभाव दीर्घ असेल.
संभावित प्रभाव
- भूकंपाचा धोका : हिमालय बेल्टमध्ये 80 टक्के जगातील मोठे भूकंप होतात. भारत, नेपाळ, चीनमध्ये लाखो घरं कोसळू शकतात. 2015 च्या नेपाळ भूकंपात 9 हजार जणांचा मृत्यू झाला होता.
- ज्वालामुखी अन् पूर : मॅग्मा वर आल्याने नवे ज्वालामुखी, ग्लेशियर वितळल्याने गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांमध्ये पूराचे प्रमाण वाढणार.
- मानवी जीवन : 10 कोटीहून अधिक लोक हिमालयन क्षेत्रात राहतात. दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के, अर्थव्यवस्थेला 1 लाख कोटीचे नुकसान.
पर्यावरण : हिमालयाची जैवविविधता धोक्यात, हवामान बदल गतिमान होणार
हे नैसर्गिक असले तरीही आम्हाला तयारीत रहावे लागेल, भूकंपरोधक इमारती निर्माण कराव्या लागतील, देखरेख वाढवावी लागेल, असे तज्ञांचे सांगणे आहे.
भारत काय करतोय
भारत सरकारने जीएसआयला वाढीव निधी दिली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी आता तिबेट सीमेवर 50 नवे सेंसर बसविणार आहे.