भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकला जाणार नाही
बीसीसीआयकडून ‘आयसीसी’ला पवित्रा स्पष्ट
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला (आयसीसी) भारतीय संघ पुढील वर्षी होणार असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही, असे कळविले असल्याची माहिती समोर आली आहे.
‘ईएसपीएनक्रिकइन्फो’नुसार, बीसीसीआयने आयसीसीला सांगितले आहे की, केंद्र सरकारने पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत होणाऱ्या आठ संघांच्या या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला दिला आहे. या ताज्या घडामोडीचा अर्थ असा आहे की, आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) आता पर्यायी योजनेवर निर्णय घ्यावा लागेल, ज्यामध्ये हायब्रीड मॉडेल योजनेचा समावेश असण्याची शक्यता आहे. या मॉडेलचा एक भाग म्हणून भारत आपले सामने इतर ठिकाणी खेळेल, तर उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होईल, असा तोडगा काढला जाऊ शकतो.
शुक्रवारी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल वापरण्याची शक्यता नाकारली होती. नाकारले होते. तथापि, ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’नुसारनुसार, हायब्रीड मॉडेलचा अवलंब करायचा झाल्यास वापरायच्या अनेक पर्यायी योजना काही महिन्यांपूर्वीच तयार केल्या गेल्या आहेत. त्यानुसार पाकशी असलेल्या जवळिकीमुळे संयुक्त अरब अमिरातीचे नाव भारताचे सामने खेळविण्यासाठी आघाडीवर आहे. तसेच श्रीलंका देखील या यादीमध्ये आहे.
‘ईएसपीएनक्रिकइन्फो’नुसार, पाकिस्तानच्या दौऱ्याबाबत बीसीसीआयच्या भूमिकेची या आठवड्यात ‘आयसीसी’ला माहिती देण्यात आली आहे. परंतु बीसीसीआयने त्यांचा निर्णय तोंडी कळवलेला आहे की काय याची पुष्टी करता आलेली नाही. हे शक्य आहे की, आयसीसी पीसीबीला माहिती देण्यापूर्वी लेखी कळविण्याची मागणी करेल. नक्वी यांनीही शुक्रवारी बीसीसीआयचे कोणतेही आक्षेप असल्यास ते पीसीबीला स्पर्धेपूर्वी लेखी कळवावे लागतील, जेणेकरून अंतिम निर्णयापूर्वी ते पाकिस्तान सरकारला कळवता येतील, असे म्हटले होते.