भारतीय संघ ‘बाझबॉल’विरुद्ध पुनरागमन करण्यास सज्ज
आजपासून दुसरा कसोटी सामना, भारताच्या दृष्टिकोनात बदलाची अपेक्षा, इंग्लंड संघात अनुभवी अँडरसनसह बशीरचा समावेश
वृत्तसंस्था /विशाखापट्टमण
भारताची इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असून दबावाखाली असलेल्या आणि कमी संसाधनांनी युक्त भारताला इंग्लंडच्या ‘बाझबॉलर्स’चा मुकाबला करण्यासाठी चौकटीबाहेर जाऊन विचार करावा लागेल. भारत क्वचितच मायदेशात दबावाखाली येतो. परंतु हैदराबादमधील नाट्यामय पराभवानंतर त्यांनी भरपूर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा आणि के. एल. राहुल यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यासमोरील आव्हान अधिक कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे बलाढ्या यजमानांना चेन्नई येथे इंग्लंडविऊद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला होता, पण पुन्हा उसळी घेऊन त्यांनी मालिका जिंकली होती. तथापि, ज्यो रूटच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या संघाचे स्वरुप वेगळे होते आणि यावेळी भारताला अशा संघाविऊद्ध लढावे लागत आहे, ज्याने कसोटी क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलून टाकली आहे. फिरकीस पोषक खेळपट्टीवर 190 धावांची आघाडी स्वीकारल्यानंतर भारत सामना जिंकण्याची सर्व चिन्हे दिसत असताना त्यांनी परिस्थिती बदलून टाकली.
ऑली पोपसह इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत स्वीप आणि रिव्हर्स स्विपचा भरपूर वापर करत रोहित आणि त्याच्या संघाला आश्चर्यचकीत केले आणि जगातील सर्वांत शक्तिशाली फिरकी त्रिकूट म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते गोलंदाज त्यांच्यासमोर सामान्य दिसले. भारताला या सामन्यात जडेजाला उतरविण्याची संधी मिळणार नाही, पण कसोटीत 500 बळींचा टप्पा गाठण्यास चार बळींची गरज असलेला अश्विन व अक्षर यांना त्यांच्या अतिआक्रमक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पुनरागमन करण्यासाठी आपल्या योजना नव्याने आखाव्या लागतील. कारण परिस्थितीची पर्वा न करता इंग्लिश फलंदाज स्वीप खेळण्याचा डावपेच भरपूर वापरण्याची शक्यता आहे.
जडेजाच्या अनुपस्थितीत डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव खेळण्याची अपेक्षा आहे आणि भारत जसप्रीत बुमराहच्या रुपाने फक्त एक वेगवान गोलंदाज घेऊन खेळणे पसंत करून आणखी एका फिरकी गोलंदाजाला खेळविण्याचे धोरण पत्करतो का हे पाहावे लागेल. तशा परिस्थितीत ऑफस्पिनर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळते की नाही हेही पाहावे लागेल. अजूनपर्यंत भारतीय संघातून न खेळलेला डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारचाही संघात समावेश करण्यात आला आहे. ‘बाझबॉल’विऊद्ध केवळ भारताच्या फिरकीपटूंचीच परीक्षा लागली नाही, तर डावखुरा फिरकीपटू टॉम हार्टलेने अविस्मरणीय पदार्पण करताना जी ‘मॅच विनिंग’ गोलंदाजी केली त्यातून भारतीय फलंदाजांचा संघर्षही समोर आला. रोहित हा कदाचित एकमेव आघाडीचा फलंदाज होता, जो दुसऱ्या डावात आश्वस्त दिसला, तर युवा खेळाडू, विशेषत: शुभमन गिलने निराशा केली.2023 मध्ये क्रिकेटच्या लहान प्र राट कोहली तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याने गिल आणि अगदी श्रेयस अय्यरवरही चांगली कामगिरी करून दाखविण्याचा प्रचंड दबाव असेल.
संघ-
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकरर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, के. एस. भरत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.
- इंग्लंड (अंतिम संघ) : बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, झॅक क्रॉली, ज्यो रूट, ऑली पोप, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वाजता. थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स 18, जिओ सिनेमा.