इंग्लंडमध्ये नवीन सुरुवात करण्यास भारतीय संघ सज्ज
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी आजपासून, शुभमन गिलला सिद्ध करावे लागेल नेतृत्व कौशल्य
वृत्तसंस्था/लीड्स
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर चषकासाठीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेस आज शुक्रवारपासून सुरुवात होत असून एक नवीन कर्णधार, एक आक्रमक प्रशिक्षक, जुन्या संघातील काही खेळाडू आणि काही नवीन चेहरे हे मिळून पुढील 45 दिवसांत एक आकर्षक यशोगाथा लिहिण्याचा निर्धार निश्चितच करतील. गेल्या नऊ दशकांत फक्त तीन भारतीय संघांनी इंग्लंडमध्ये मालिका जिंकलेल्या आहेत. त्यात अजित वाडेकरचा 1971 चा संघ, 1986 मधील कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघ आणि 2007 मधील राहुल द्रविडचा संघ यांचा समावेश होतो. त्यामुळे इतिहासाचा विचार करता चित्र तितकेसे उजळ नाही. गेल्या दशकभरातील भारताचा कसोटीतील सर्वांत समर्पित क्रिकेटपटू विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीचा सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे भारताची फलंदाजी ही अनुभवाच्या बाबतीत थोडीशी कमकुवत वाटते.
अतिरिक्त फलंदाज की, दोन अष्टपैलू ?
कोहली आणि रोहितच्या जाण्यानंतर भारतीय संघाच्या चेंज रूममधील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती बनलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे आधीच पाठीशी सहा पराभव असताना कामगिरी आणखी खराब होणार नाही याची दक्षता घेऊ पाहतील. गंभीरच्या रणनीतिक कौशल्याची ही पहिली खरी कसोटी असेल. सरावादरम्यान पहायला मिळालेल्या स्लिपमधील रचनेचा विचार केल्यास कऊण नायरचे पुनरागमन निश्चितच महत्त्वाचे वाटते. सरावावेळी तो पहिल्या स्लिपवर उभा होता. गंभीर अतिरिक्त फलंदाज खेळवेल आणि प्रतिभावान बी. साई सुदर्शनला पदार्पणाची संधी देईल की, अतिरिक्त तज्ञ फलंदाजाची कमतरता भरून काढण्यासाठी तो नितीश रे•ाr आणि शार्दुल ठाकूर या दोन मध्यमगती गोलंदाजी टाकू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंना खेळवेल हे पाहावे लागेल.
गोलंदाजीच्या रचनेबाबतही प्रश्न
कुलदीप यादवला खेळविण्याचाही मोह होऊ शकतो, कारण तो कुठल्याही खेळपट्टीवर चेंडू वळवू शकतो. परंतु ‘सेना’ देशांमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी घडलेली नसूनही रवींद्र जडेजा हा क्रमांक 7 वरील एक मजबूत फलंदाज आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे परिस्थितीनुसार टी-20 तील तज्ञ गोलंदाज अर्शदीप सिंगला तिसरा सिमर म्हणून खेळवायचे की, वेगवान प्रसिद्ध कृष्णाला होकार द्यायचा, हाही प्रश्न गंभीरसमोर निर्माण होणार आहे. त्याशिवाय आकाश दीप आहे, जो या परिस्थितीत बुमराह आणि सिराजसाठी परिपूर्ण साथीदार ठरू शकतो. गंभीर जे निर्णय घेईल ते भारताच्या खेळाची दिशा निश्चित करतील.
यजमान संघाने आधीच त्यांच्या अकरा खेळाडूंची घोषणा केली आहे आणि स्टोक्स आणि मेकॉलम यांनी फलंदाजी कौशल्यावर भर देऊन अकरा जण निवडले आहेत. तिथे वोक्स 8 व्या क्रमांकावर खेळेल. वोक्सने भारताविऊद्ध कसोटी शतक झळकावलेले आहे आणि तो चांगला फलंदाज आहे. परंतु बुमराह आणि सिराज यांच्याविऊद्ध झॅक क्रॉली आणि बेन डकेट कशी सुऊवात करतात यावर देखील बरेच अवलंबून असेल. याशिवाय भारताविरुद्धच्या मागील मालिकेत बुमराहने ऑली पोपला भरपूर सतावले होते. परंतु मालिकेचा निकाल ठरविण्याच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका रूट विऊद्ध बुमराह हे द्वंद्व बजावेल.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी
इंग्लंड आणि भारत कसोटी संघ आता पतौडी नव्हे, तर अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी खेळतील. सर जेम्स अँडरसन आणि सचिन तेंडुलकर यांच्या कसोटी क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीला समर्पित ही नवीन ट्रॉफी असणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमातून आयोजित अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी आता इंग्लंड आणि भारत यांच्यातील भविष्यातील सर्व कसोटी मालिकांचे प्रतिनिधित्व करेल. पूर्वी, इंग्लंडमधील मालिका पतौडी ट्रॉफीसाठी आणि भारतात मालिका अँथनी डी मेलो ट्रॉफीसाठी खेळवली जात असे. पतौडी कुटुंबाचा सन्मान कायम राखला जाईल आणि म्हणूनच इंग्लंड-भारत कसोटी मालिकेतील प्रत्येक विजेत्या कर्णधाराला पतोडी मेडल देण्यात येईल. या ट्रॉफीमध्ये अँडरसन आणि तेंडुलकर यांच्या प्रतिमा आहेत, तसेच त्यांच्या कोरलेल्या स्वाक्षऱ्या आहेत.
इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक, तीन नव्या चेहऱ्यांना संधी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून लीड्समध्ये सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याआधीच इंग्लंडने आपल्या अंतिम 11 खेळाडूंची यादी जाहीर करून क्रिकेटप्रेमींना चकित केले आहे. प्लेइंग इलेव्हनमधून तीन महत्त्वाचे खेळाडू वगळण्यात आले आहेत. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. तर एका स्पेशालिस्ट स्पिनरला स्थान मिळाले आहे. जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन आणि सॅम कुक यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. लीड्सची खेळपट्टी पाहता इंग्लंडने आपल्या संघात 4 गोलंदाज ठेवले आहेत, त्यापैकी एक फिरकी गोलंदाज शोएब बशीर आहे. यजमान संघ एका फिरकी गोलंदाजासह मैदानावर उतरला आहे आणि तीन वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त, त्यांच्याकडे कर्णधार बेन स्टोक्स आहे. जो स्वत: एक मध्यमगती गोलंदाज आहे. इंग्लिश संघात ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर यांच्यावर अवलंबून आहे. इंग्लंड संघातील ख्रिस वोक्स हा एकमेव अनुभवी गोलंदाज आहे, ज्याने टीम इंडियाला अडचणीत आणले आहे आणि यावेळी तो इंग्लंडचा सर्वात मोठा स्ट्राईक बॉलर असेल.
सोनी स्पोर्ट्स, जिओ हॉटस्टारवर सामने पाहता येणार
भारत व इंग्लंड यांच्यातील सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. याशिवाय, जिओ हॉटस्टारवर देखील हे सामने पाहता येणार आहेत. तसेच उभय संघातील सर्व सामने डीडी स्पोर्ट्सवर पाहता येणार आहेत.
►इंग्लंड-बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशिर.
►भारत-शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, कऊण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा.
सामन्याची वेळ : (भारतीय वेळेनुसार) दुपारी 3:30 वा.