For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉकी फाईव्ह क्रमवारीत भारताचे संघ दुसऱ्या स्थानी

06:51 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॉकी फाईव्ह क्रमवारीत भारताचे संघ दुसऱ्या स्थानी
Advertisement

वृत्तसंस्था/ लॉसेन, स्वित्झर्लंड

Advertisement

हॉकी फाईव्ह या क्रीडाप्रकारासाठी एफआयएचकडून प्रथमच जागतिक मानांकन जाहीर करण्यात आले असून भारताच्या पुरुष व महिला संघांना या क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे.

भारताचा पुरुष हॉकी फाईव्ह संघ ओमान व मलेशिया यांच्यासमवेत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. तिन्ही संघांचे प्रत्येकी 1400 गुण झाले आहेत. या प्रकारातील आशियाई चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर भारताला मस्कत येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाचवे स्थान मिळाले. 28-31 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा झाली. ओमानने वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच खेळताना घरच्या प्रेक्षकांसमोर कांस्यपदक मिळविण्याचा पराक्रम केला. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चौथे स्थान मिळालेल्या मलेशियाने वर्ल्ड कपमध्ये मात्र आपल्या कामगिरीत सुधारणा करीत उपविजेतेपद पटकावले.

Advertisement

1750 गुणांसह नेदरलँड्स अग्रस्थानी असून वर्ल्ड कपचे त्यांनीच जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत त्यांनी युरोपियन चॅम्पियन पोलंड (1350), इजिप्त (1350) यांना पराभूत केले होते. पोलंड व इजिप्त संघ जागतिक क्रमवारीत संयुक्त पाचव्या स्थानावर आहेत. विश्वचषक स्पर्धेत पोलंडचे कांस्यपदक थोडक्यात हुकले तर इजिप्तने सहावे स्थान मिळविले. त्रिनिदाद-टोबॅगो व केनिया प्रत्येकी 1200 गुणांसह संयुक्त सातव्या स्थानावर आहेत. पाकिस्तान या क्रमवारीत 1150 गुणांसह नवव्या स्थानावर असून त्यांनी वर्ल्ड कपमध्ये चॅलेंजर ट्रॉफी जिंकली होती. ऑस्ट्रेलिया संघ 1100 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

महिलांच्या हॉकी फाईव्ह प्रकारात नेदरलँड्स पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी वर्ल्ड कप व युरोपियन चॅम्पियनशिप दोन्ही स्पर्धा जिंकल्याने त्यांचे एकूण 1750 गुण झाले. भारतीय महिलांनी वर्ल्ड कपमध्ये रौप्य मिळविले तर त्याआधी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावले. 1550 गुणांसह त्यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. वर्ल्ड कपमध्ये कांस्य मिळविणाऱ्या पोलंडने 1450 गुणांसह तिसरे स्थान घेतले आहे. उरुग्वे (1350), दक्षिण आफ्रिका (1350) संयुक्त चौथ्या, मलेशिया (1250) सहाव्या स्थानावर आहे. मलेशियाने वर्ल्ड कपमध्ये सहावे स्थान मिळविले होते. युव्र्रेन, न्यूझीलंड, अमेरिका प्रत्येकी 1200 गुणांसह संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत. नामिबिया 1150 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :

.